मुंबई : केंद्र शासनाने जम्मू-काश्मीरचे ३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव सोमवारी राज्यसभेत मांडला. आता या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन कंपन्यांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.वातावरण निवळल्यानंतरच जम्मू-काश्मीरच्यापर्यटनासंबंधी ठोस निर्णय घेण्यात येईल, असे पर्यटन कंपन्यांंनी ठरविले आहे. शिवाय, केंद्र शासनाच्या या निर्णयानंतर भविष्यात जम्मू-काश्मीरच्या पर्यटनाला चांगले दिवस येतील, असा विश्वासही व्यक्त केला. दरम्यान, यापूर्वी फेब्रुवारीत पुलवामा हल्ल्यामुळे काश्मीरच्या पर्यटनावर काहीसा परिणाम झाला होता.सद्यस्थितीत जम्मू-काश्मीरच्या सहली पुढील १५ दिवसांकरिता पुढे ढकलल्याची माहिती केसरी टुर्सचे संचालक हिमांशू पाटील यांनी दिली. त्यांनी सांगितले की, सप्टेंबर ते आॅक्टोबरपर्यंत पर्यटन काळ असतो. आता मुख्यत: जम्मू-काश्मीरमधील स्थितीमुळे पर्यटन बंद आहे. जम्मू-काश्मीरसंदर्भात कोणत्याही सहली रद्द केल्या नसून पुढे ढकलण्यात आल्या आहेत, परंतु सध्या तरी या संदर्भात वाट पाहून मगच पुढील दिशा ठरविण्यात येईल. सरकारच्या आदेशानंतर अमरनाथ यात्रेकरिता गेलेले ४० पर्यटक परतल्याची माहिती यात्रा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बारडे यांनी दिली. भविष्यातील सहली पुढे ढकलण्यात आल्या असून, त्यांचे नियोजन महिन्याभरात करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.श्रीनगर, सोनमर्ग, गुलमर्ग येथे पर्यटकांची संख्या जास्त आहे. सध्या काश्मीरमध्ये फारसे पर्यटक नव्हते. मात्र, दिवाळीच्या पर्यटनाच्या कालावधीवर याचे पडसाद दिसून येतील आणि प्रतिसाद अल्प असेल, अशी माहिती राजा राणी ट्रॅव्हल्सचे संचालक विश्वजीत पाटील यांनी दिली. पाटील म्हणाले की, भविष्यात केंद्र शासनाच्या निर्णयानंतर सहलींचे नियोजन करण्यात येईल.काश्मीरच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या निर्णयाचा विचार केला असता, हा निर्णय पर्यटन क्षेत्रासाठी अत्यंत सकारात्मक आहे. काश्मीरमध्ये गुंतवणूक वाढली की, पर्यटन क्षेत्राचा आवाका वाढेल. त्यामुळे काही काळासाठी स्थानिक पर्यटक व्यावसायिकांना याचा फटका सहन करावा लागेल. मात्र, याचे दूरगामी परिणाम चांगले आहेत, हे लक्षात घ्यायला हवेत.हिमाचल प्रदेशकडे पर्यटकांचा मोर्चाजम्मू-काश्मीरचे पर्यटन बंद झाल्यानंतर पर्यटकांनी हिमाचल प्रदेशला पंसती दर्शविली आहे. याशिवाय, ईशान्य पूर्वेकडील अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, सिक्कीम या पर्यटन स्थळांकडे ओढा वाढणार आहे. दिवाळीच्या सुट्टीच्या काळातही याच पर्यटन स्थळांना पर्यटकांची पसंती असेल, असा दावा पर्यटन कंपन्यांकडून करण्यात येत आहे.
काश्मीरसंदर्भात ‘वेट अँड वॉच’ची पर्यटन कंपन्यांची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 4:45 AM