नवी दिल्ली : हरयाणाच्या नूह जिल्ह्यात दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर नुकतीच रोल्स रॉयस कार टँकरवर धडकून दोघांचा मृत्यू झाला. अपघातावेळी विकास मालू हे उद्योगपती कारमध्ये होते. अपघातावेळी ते कार चालवत हाेते काय याचा आम्ही तपास करत आहोत, असे नूहचे पोलिस अधीक्षक नरेंद्र बिजारनिया यांनी सांगितले.
ही दुर्घटना २२ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. २०० किमी प्रति तास वेगाने कारने धडक दिल्याने डिझेल टँकर उलटला. ही धडक एवढी भीषण होती की दोन्ही वाहनांनी पेट घेतला. टँकरचा चालक, क्लिनर आत अडकले होते तर टँकरमधील तिसरा माणूस बाहेर पडला. कारमधील तिन्ही प्रवासी गाडी पूर्णपणे जळण्यापूर्वी बाहेर पडण्यात यशस्वी झाले. ट्रकमधील दोघांचा मात्र मृत्यू झाला,” असे पोलिसांनी सांगितले.
कारमधील तिघांत चंडीगड येथील दिव्या व तसबीर व गुडगाव येथील विकास यांचा समावेश आहे. हे तिघेही रुग्णालयात उपचार घेत आहेत. गुडगाव येथील मेदांता हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले की, तीन जखमींमध्ये उद्योगपतीचा समावेश आहे, असे बिजारनिया म्हणाले. (वृत्तसंस्था)