दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर मंगळवारी एक भीषण अपघात झाला आहे. 10 कोटी रुपयांची रोल्स रॉयस फँटम VIII कार एका टँकरला धडकली. या भीषण अपघातामुळे मोठा स्फोट झाला आणि लग्झरी कारने अचानक पेट घेतला. हरियाणातील नूह जिल्ह्यात हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका तेलाच्या टँकरची रोल्स रॉयस लक्झरी कारला धडक बसली. या धडकेत टँकर उलटला. अपघातानंतर कोट्यवधी रुपयांच्या आलिशान कारला आग लागली. जी काही वेळातच पूर्णपणे जळून राख झाली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत.
नुह येथील शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला या तीन जखमींवर गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे एएसआय अशोक कुमार यांनी सांगितले. अद्याप पोलिसांकडे जबाब नोंदवण्यात आलेला नाही.
पोलिसांनी जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांना माहिती दिली आहे. या घटनेत 2 जणांना आपला जीव गमवावा लागला आणि एक आलिशान कार काही क्षणातच राख झाली. Rolls-Royce Phantom VIII भारतात फेब्रुवारी 2018 पासून विक्रीसाठी आहे. सध्या तिची किंमत जवळपास 10 कोटी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.