चेन्नई - न्यायालय म्हटलं की वकिलांच्या चालचालींकडे, त्यांच्या वागण्या-बोलण्याकडेच सर्वांचे लक्ष असतं. मद्रास उच्च न्यायालयातील एका खटल्यात वकिलाने केलेल्या अश्लील चाळ्यामुळे न्यायालयासही नामुष्की सहन करावी लागली. व्हर्च्युअल कोर्टात सुनावणीवेळी वकिलाचे महिलेसोबत अश्लील चाळे सुरू होते, विशेष म्हणजे कॅमेरा सुरू असल्याने हे सर्व चित्रीकरण झाले. आता या प्रकरणी सीबी-सीआयडीला गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
न्यायालयातील व्हर्च्युअल सुनावणीवेळी आपला केस नंबर कधी येईल हे पाहत असतानाच वकिलाचा रोमान्स मूड झाला. वकिलाच्या या रोमान्सचा कार्यक्रम व्हिडिओत कैद झाला असून सोमवारी सकाळी ही घटना घडली. एकीकडे न्यायाधीश व्हिडिओ कॉन्फरेन्सींगद्वारे खटल्याची सुनावणी करत होते, मात्र दुसरीकडे वकिलांचे ते अश्लील चाळे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरला झाला असून व्हिडिओत वकिल एका महिलेसोबत इंटिमेट होताना दिसून येत आहेत.
चेन्नई उच्च न्यायालयाने या व्हिडिओची गंभीर दखल घेत फौजदारी अवमानाची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच, सुनावणीवेळी अशाप्रकारच्या अश्लीलतेचे प्रदर्शन न्यायालय मूक होऊन पाहू शकत नाही, असेही त्यांनी उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. IT कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवून २३ डिसेंबरपर्यंत प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. या अश्लील कृत्यात सहभागी झालेल्यांची नावे देण्यासही कोर्टाने सांगितले. तर, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या बार कौन्सिलने संबंधित वकिलाच्या वकिलीवर बंदी घातली आहे. दरम्यान, या व्हिडिओचा प्रसार थांबविण्यासाठी इंटरनेटवरुन व्हिडिओ काढून टाकण्याचे निर्देशही पोलिसांनी न्यायालयाने दिले आहेत.