नवी दिल्ली : रोमिओने केवळ एकाच स्त्रीवर प्रेम केले होते आणि त्याने महिलांची छेड काढल्याचा कुठेच उल्लेख नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशात मुली व महिलांची छेड काढणाऱ्या तरुणांविरुद्ध स्थापन करण्यात आलेल्या पथकाला अँटी रोमिओ स्क्वाड असे नाव देणे चुकीचे आहे. भगवान कृष्ण मात्र गोपिका व महिलांचे छेड काढण्यासाठी ओळखले जायचे. त्यामुळे मुख्यमंत्री त्या पथकाचे नाव अँटी कृष्ण पथक असे ठेवणार का, सवाल प्रख्यात विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी टिष्ट्वटद्वारे केला आहे. त्यामुळे नवाच वाद निर्माण झाला असून, लखनौमधील पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.भाजपाचे नेते या प्रशांत भूषण यांच्या वक्तव्यामुळे संतापले असून, पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी टिष्ट्वटरद्वारेच भूषण यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. भगवान श्रीकृष्णांना समजून घेण्यासाठी तुम्हाला खूप जन्म घ्यावे लागतील, असे त्यांनी म्हटले आहे. तुम्ही श्रीकृष्णालाही राजकारणात खेचणे, हे दुर्दैवी आहे, असेही पात्रा यांनी म्हटले आहे. टिष्ट्वटरवर अनेकांनी भूषण यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे, तर काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे. उदाहरणे देताना सर्वांनीच काळजी घ्यायला हवी, असा सूर उमटला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
रोमिओ महिलांची छेड काढत नव्हता
By admin | Published: April 03, 2017 5:06 AM