ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. 29 - कानपूरमध्ये एक 60 वर्षांची महिला सध्या चर्चेचा विषय बनली आहे. दिवसेंदिवस या महिलेच्या शारीरिक उंचीमध्ये घट होत असल्याने ती चर्चेचा विषय बनली आहे. शांतीदेवी असे या महिलेचे नाव आहे. कानपूरमधील धरऊ गावातील त्या रहिवासी आहेत. एकेकाळी 5 फूट उंच असणा-या शांतीदेवींची उंची आता केवळ 2 फूट झाली आहे. 25 वर्षांपूर्वी झालेल्या अपघातामुळे त्यांना एका विचित्र आजाराची लागण झाली आहे, असं डॉक्टरांचे म्हणणे आहे. या विचित्र आजारामुळे शांतीदेवींच्या शरीरावर परिणाम झाला आहे. शिवाय त्यांना हिंडणे-फिरणे देखील कठीण झाले आहे.
25 वर्षांपूर्वी घराचे काम सुरू असताना शांतीदेवींच्या अंगावर छप्पर कोसळले. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. पण काही महिन्यांनी शरीराचे दुखणे वाढले. त्यानंतर शारीरिक उंचीमध्ये घट होण्यास सुरुवात झाली. आजारावर उपाय शोधण्यासाठी अनेक डॉक्टरांकडे उपचार घेण्यात आले. मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही.
जिल्ह्याच्या एका वरिष्ठ डॉक्टरांच्या माहितीनुसार हा आजार ओस्टियोपोरोसिस नावाने ओळखला जातो. महिलांमध्ये एस्ट्रोजेन हार्मोनच्या कमतरतेमुळे हा आजार होतो. शांतीदेवींच्या हाडांची झीज होत असल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.