उत्तराखंडच्या रुरकीमधून एका महिलेची प्रेरणादायी घटना समोर आली आहे. कोरोनात महिलेच्या पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेने परिस्थितीसमोर हार न मानता कुटुंबीयांची जबाबदारी घेतली. आता ती ई-रिक्षा चालवून आपल्या तीन मुलांचं पालनपोषण करत आहे. कुटुंबीयांसाठी एक वेगळा मार्ग निवडून ती कष्ट करत आहे. तिच्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळत आहे.
कोरोना महामारीदरम्यान महिलेच्या पतीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आणि तिचं संपूर्ण आयुष्यच बदललं. पतीचा अचानक मृत्यू झाल्याने ती पूर्णपण खचली. मात्र नंतर मुलांसाठी तिने स्वत:ला सावरलं. आपल्या तीन लहान मुलांकडे पाहून हिंमत न हारता पुन्हा जिद्दीने उभं राहण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.
आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी, तिने घरोघरी जाऊन काम केलं. मात्र यामुळे घर चालवणं शक्य नव्हतं. यानंतर तिने चहाची टपरी सुरू करण्याचा प्रयत्न केला. लोकांचे टोमणे ऐकून ती कंटाळली आणि तिने टपरी बंद केली. यानंतर या महिलेने ई-रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला आणि आता ती आपल्या मुलांना त्याच्यामदतीनेच मोठं करत आहे.
ई-रिक्षा चालवणं हे सोपं काम नाही. ती दररोज ५०० ते ६०० रुपये कमावते. तिने अनेकांकडे मदत मागितली पण कोणीच तिला मदत करण्यासाठी पुढे आलं नाही. त्यामुळे तिनेच आता खंबीरपणे उभं राहून कुटुंबाची जबाबदारी घेतली आहे. ती मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी खूप कष्ट करत आहे.