रायपूर-
काँग्रेस नेता प्रियांका गांधी वाड्रा आज तीन दिवसीय काँग्रेसच्या ८५ व्या महाअधिवेशनात सामील होण्यासाठी छत्तीसगडच्या नव्या रायपूर येथे पोहोचल्या. यावेळी प्रियांका यांच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी विमानतळासमोरील रस्त्यावर गुलाबाच्या पाकळ्यांची चादरच अंथरली होती.
प्रियांका गांधी यांच्या स्वागतासाठी जवळपास २ किमी रस्त्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा खच होता. यासाठी तब्बल ६ हजार किलोहून अधिक गुलाबाच्या फुलांचा वापर करण्यात आला होता. फुलांच्या पाकळ्यांनी रस्ता सजून निघाला होता तर रस्त्याच्या कडेला लोककलावतांकडून विविध सादरीकरणातून प्रियांका गांधी यांचं स्वागत करण्यात आलं.
छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मोहन मरकाम आणि पक्षाचे इतर महत्वाचे नेते प्रियांका गांधी यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. प्रियांका गांधी आज सकाळी साडेआठच्या सुमारास स्वामी विवेकानंद विमानतळावर पोहोचल्या होत्या. विमानतळावरुन त्या मुख्यमंत्री बघेल यांच्या कारमधून निघाल्या. यावेळी त्यांच्यासोबत इतर नेत्यांच्याही वाहनांचा ताफा होता. शहरात रस्त्याच्या दुतर्फा काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली होती. विमानतळापासून जवळपास दोन किमी अंतरापर्यंत गुलाबाच्या पाकळ्यांची पखरण रस्त्यावर केली होती आणि हेच सर्वांचं मोठं आकर्षण ठरलं होतं. याशिवाय प्रियांका गांधी कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतरही त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव केला गेला.
महापौर एजाज यांनी केली सर्व व्यवस्थारायपूरचे महापौर एजाज ढेबर म्हणाले की, रस्त्यावर सजावट करण्यासाठी ६ हजार किलोहून अधिक गुलाबांचा वापर करण्यात आला आहे. मी नेहमीच आपल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या स्वागतासाठी काहीतरी विशेष करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रियांका गांधी यांच्या स्वागतासाठी मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी व्यासपीठ तयार करण्यात आले होते. जिथं कार्यकर्त्यांनी प्रियांका गांधी यांच्यावर फुलांची उधळण केली.