नवी दिल्ली : हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने (Rouse Avenue Court) दोषी ठरवले आहे. शनिवारी झालेल्या सुनावणीवेळी ओम प्रकाश चौटाला कोर्टात हजर होते. आता 26 मे रोजी कोर्टात ओम प्रकाश चौटाला यांच्या शिक्षेवर सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यानंतर दोन दिवसांपूर्वी दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने निकाल राखून ठेवला होता.
26 मार्च 2010 रोजी सीबीआयने माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांच्याविरोधात कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. ओम प्रकाश चौटाला यांनी 1993 ते 2006 या कालावधीत 6.09 कोटी रुपयांची मालमत्ता कथितरित्या जमा केली आहे, जी त्यांच्या वैध उत्पन्नापेक्षा खूपच जास्त आहे. दुसरीकडे, ओम प्रकाश चौटाला यांचे कुटुंबीय नेहमीच त्यांच्यावरील आरोपांना राजकीय हेतूने केल्याचे म्हणत होते.
2019 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांची 3 कोटी 68 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. या मालमत्तांमध्ये ओम प्रकाश चौटाला यांच्या मालकीचे फ्लॅट, भूखंड आणि जमिनीचा समावेश होता. जप्त केलेल्या मालमत्ता नवी दिल्ली आणि हरयाणातील पंचकुला आणि सिरसा जिल्ह्यातील आहेत. बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणात मनी लाँड्रिंग अंतर्गत नोंदवलेल्या एफआयआरच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आली होती.
तिहारमध्ये 10 वर्षांची शिक्षा भोगली दरम्यान, माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना जानेवारी 2013 मध्ये जेबीटी घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आले होते. भ्रष्टाचार प्रतिबंधक प्रकरणात सात वर्षे आणि कट रचल्याबद्दल दोषी आढळल्यामुळे 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. गेल्या वर्षी जुलैमध्ये ओम प्रकाश चौटाला आपली शिक्षा पूर्ण करून दिल्लीच्या तिहार तुरुंगातून बाहेर आले होते.