जयपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील खासदार प्रफुल्ल पटेल यांचा मुलगा प्रजय याच्या विवाहाचा रिसेप्शन सोहळा जयपूर येथे होत आहे. प्रजयचा रिसेप्शन सोहळा राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमधील रामबाग पॅलेस हॉटेलमध्ये होत आहे. या सोहळ्यामध्ये उद्योगपती अनील अंबानी आणि गौतम अदानींसह अनेक उद्योगपती, राजकारणी, चित्रपट क्षेत्रामधील कलाकार आणि क्रिकेटपटूंनी खास उपस्थिती लावली.
प्रफुल्ल पटेल यांचे पुत्र प्रजय पटेल याचा विवाह मुंबईतील ज्येलरी व्यावसायिक शिरीश पुंगिलिया यांची कन्या शिविका हिच्याशी झाला होता. शिरीष हे मुळचे जयपूरचे आहेत. त्यामुळे विवाहानंतरचा स्वागतसमारंभ जयपूर येथेच ठेवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार प्रजयच्या विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी बॉलिवूडचे कलाकार, राजकीय पक्षांचे नेते, व्यावसायिक, क्रिकेटपटू आपल्या कुटुंबासह जयपूरमध्ये दाखल झाले आहेत. १८ डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत सुमारे ३५ विमाने जयपूरमध्ये पोहोचली होती. प्रज्वल याच्या रिसेप्शनमध्ये सहभागी होण्यासाठी उद्योगपती सज्जन जिंदाल, अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी, अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी टीना अंबानी, भारती एअरटेल समुहाचे प्रमुख सुनील भारती आणि त्यांची पत्नी, हिंदुजा समुहाचे श्रीचंद हिंदूजा हे जयपूरमध्ये पोहोचले आहेत.
त्याबरोबरच या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी सलमान खान, शिल्पा शेट्टी, शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत, वेदांत रिसोर्सेज लिमिटेडचे संस्थापक अनिल अग्रवाल, भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री हेसुद्धा जयपूरपर्यंत पोहोचले आहेत. त्याशिवाय मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, टाटा मेमोरियल रुग्णालयाचे ज्येष्ठ डॉक्टर आर.के. देशपांडे, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे हेही या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
त्याशिवाय हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, जया बच्चन, फारुख अब्दुल्ला, डॉ. केतन देसाई, भाजपाचे नेते राजीव प्रताप रुढी हेही जयपूरमध्ये पोहोचले आहेत. यादरम्यान, विमानतळ व्यवस्थापनाने विमानांची ये जा करण्यासाठी विशेष व्यवस्था केली गेली होती. तसेच विमानतळावर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.