मुंबई : एकीकडे महायुतीच्या जागावाटपाचे गुऱ्हाळ सुरू असतानाच रिपाइंचे उपाध्यक्ष दीपक निकाळजे यांनी मात्र चेंबूर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत खळबळ निर्माण केली आहे. विशेष म्हणजे उपाध्यक्षाने अर्ज भरला असला तरी पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांनी मात्र आपणास काहीच माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचे भाऊ दीपक निकाळजे यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन केले. आंबेडकर उद्यान ते चेंबूर नाका अशी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्यांनी अर्ज दाखल केला. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे स्थानिक जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांसह मतदारसंघातील अनेक वॉर्ड अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण पक्षातर्फे आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या परवानगीनेच अर्ज भरल्याचे निकाळजे यांनी लोकमतला सांगितले. चेंबूरची जागा भाजपाच्या कोट्यातील असून येथे दलित समाजाची मते मोठ्या प्रमाणावर असल्याने रिपाइंने यावर दावा केला. मात्र, अद्याप शिवसेना आणि भाजपाचा जागावाटपाचा घोळ संपला नसल्याने घटक पक्षांचा निर्णय खोळंबला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे येथील आमदार आहेत. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत निकाळजे यांना रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीवर येथून निवडणूक लढवीत २० हजार मते घेतली. एकीकडे महायुतीतील तिढा सुटला नाही. दुसरीकडे रिपाइंतील अन्य नेतेही चेंबूरवर डोळा ठेवून असल्याने महायुतीचा निर्णय होण्यापूर्वीच निकाळजे यांनी अर्ज भरला असल्याचे सांगण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत चेंबूरमधून निवडणूक लढवायचीच, असा निर्धार निकाळजे यांनी केला आहे. महायुतीकडून उमेदवारी मिळाली तर ठीक अन्यथा अपक्ष म्हणून निकाळजे रिंगणात असतील. (प्रतिनिधी)
रिपाइं उपाध्यक्षांनी भरला उमेदवारी अर्ज
By admin | Published: September 24, 2014 2:53 AM