- देवेश फडके
भारतीय रेल्वे पुन्हा एकदा कात टाकताना दिसत आहे. जर्मन तंत्रज्ञानावर आधारलेल्या एलएचबी डब्यांच्या निमित्ताने भारतीय रेल्वेने एका नव्या अध्यायाला सुरुवात केली. यानंतर यात अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला. यानंतर ट्रेन १८ म्हणजेच वंदे भारत एक्सप्रेसने भारतीय रेल्वेला विशेष ओळख निर्माण करून दिली. आता भारतीय रेल्वे पुन्हा एक नवा अध्याय लिहिण्याच्या तयारीत आहे. भारतीय रेल्वे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवताना दिसत आहे. यातील काही प्रकल्प अस्तित्वात येताना दिसत आहेत. तर काही प्रकल्प लगतच्या काळात पूर्णत्वास जाताना दिसतील. गेल्या अनेक वर्षांपासून बुलेट ट्रेनचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीयांना दुधाची तहान ताकावर भागवणाऱ्या एका प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले आहे. तो म्हणजे रॅपिडएक्स.
दिल्ली मेरठ रिजिनल रॅपिड ट्रानसिट सिस्टीम म्हणजेच RRTS च्या १७ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. आरआरटीएस हा दोन शहरांना जोडणारा एक प्रकल्प असून, पुढे याचा विस्तार केला जाणार आहे. देशातील विद्यमान मेट्रो संचालनाचे हे एक पुढचे पाऊल आहे. या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या ट्रेनला रॅपिडएक्स म्हणजेच नमो भारत म्हटले जात आहे. जिथे रस्ते किंवा सामान्य रेल्वे प्रवासाला काही तास लागत होते, तेच अंतर रॅपिडएक्स काही मिनिटांत कापणार आहे. या ट्रेनचा कमाल वेग १६० किमी आहे. ०८ मार्च २०१९ दिल्ली-गाझियाबाद-मेरठ या कॉरिडोअरचे भूमिपूजन करण्यात आले होते. आता २० ऑक्टोबर २०२३ रोजी या कॉरिडोअरचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. यानंतर २०२५ पर्यंत या संपूर्ण कॉरिडोअरचे काम पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. हे प्रकल्प बुलेट ट्रेनच्या दिशेने पडत असलेले एक पुढचे दमदार पाऊल आहे, असेच म्हणावे लागेल.
रॅपिडएक्समधील सोयी सुविधा आणि अत्याधुनिकता
आरआरटीएसचा पहिला १७ किमी लांबीचा टप्पा दुहाई डेपो ते साहिबाबादपर्यंत आहे. साहिबााबाद आणि दुहाई डेपोमधील प्राधान्य विभागात पाच स्थानके आहेत – साहिबााबाद, गाझियाबाद, गुलधर, दुहाई आणि दुहाई डेपो. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी हा टप्पा प्रवाशांच्या सेवेत सुरू झाला आहे. रॅपिडएक्स नमो भारत ट्रेनची सकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत चालतील. सुरुवातीला ट्रेन दर १५ मिनिटांनी उपलब्ध असतील. भविष्यात ट्रेनला मिळणारा प्रतिसाद पाहून नमो भारत ट्रेनची सेवा वाढण्यात येणार आहे. प्रत्येक RAPIDEX ट्रेनमध्ये एका प्रीमियम कोचसह एकूण सहा डबे असतील. प्रत्येक ट्रेनमध्ये एक डबा महिलांसाठी राखीव असेल. इतर डब्यांमध्ये महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जागा राखीव असतील. या ट्रेनमध्ये एकावेळी सुमारे १७०० प्रवासी प्रवास करू शकतात. या ट्रेनच्या सामान्य डब्यात ७२ आसने आणि प्रत्येक प्रीमियम डब्यात ६२ आसने आहेत. रॅपिडएक्स ट्रेनच्या वेगाची तुलना बुलेट ट्रेनच्या वेगाशी केली जात आहे. अलीकडचे मीडियासाठी रॅपिडएक्स ट्रेनची विशेष फेरी आयोजित करण्यात आली होती. या विशेष फेरीतही या ट्रेनने ताशी १५० किमी वेग गाठला होता. या ट्रेनच्या प्रत्येक कोचमध्ये स्टेशनची नावे, वेग आणि अन्य माहिती देण्यात आली आहे. संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या ट्रेनमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे, मोबाइल चार्जिंगपासून ते रिक्लायनिंग सीटपर्यंत सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोयी सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच आरआरटीएस प्रकल्पातील भली मोठी स्टेशन आधुनिक यंत्रणांनी सुसज्ज आहेत.
प्रत्येक ट्रेनमध्ये ३६ कॅमेरे आणि AI आधारित आधुनिक सुरक्षा यंत्रणा
NCRTC ने प्रवाशांची सुरक्षा आणि सुरक्षितता आणि RRTS पायाभूत सुविधा सुनिश्चित करण्यासाठी तसेच कोणत्याही बेकायदेशीर आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासह सुसज्ज सुरक्षा प्रणाली आणली आहे. ही सुरक्षा यंत्रणा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ने युक्त आहे. साहिबााबाद, गाझियाबाद, गुलधर, दुहई आणि दुहाई डेपो या पाचही स्टेशनवर सीसीटीव्हीचे जाळे उभारण्यात आले आहे. तसेच यामध्ये एक स्टेशन स्तरावर आणि दुसरा मध्यवर्ती स्तरावर अशी द्विस्तरीय सुरक्षा व्यवस्था सज्ज करण्यात आली आहे. प्रत्येक नमो भारत ट्रेनमध्ये ३६ कॅमेरे लावण्यात आले आहेत. या अंतर्गत एक समर्पित सुरक्षा नियंत्रण कक्ष प्रवाशांच्या सुरक्षेवर चोवीस तास लक्ष ठेवणार आहे. या नियंत्रण कक्ष सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सतत संपर्कात असणार आहे. याशिवाय स्टेशन एंट्रीवरील बॅगेज स्कॅनर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (AI) सुसज्ज असतील, जे सर्व प्रकारचे सामान सहजपणे स्कॅन करण्यास सक्षम असतील. NCRTC ने उत्तर प्रदेश विशेष संरक्षण दलाच्या जवानांना ऑपरेशनल प्रक्रियेत तसेच विविध अत्याधुनिक सुरक्षा उपकरणांचा वापर आणि आपत्कालीन परिस्थितींना प्रभावीपणे कसे सामोरे जावे याचे प्रशिक्षण दिले आहे.
मेट्रो ट्रेन आणि वंदे भारत यांचा मिलाफ
देशात अनेक ठिकाणी मेट्रो ट्रेन सुरू झाल्या आहेत. भविष्यात मेट्रो ट्रेनचे जाळे अधिक गडद होणार आहे. याशिवाय पारंपरिक रेल्वे सेवांचा विस्तारही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. आधुनिक मेट्रो आणि पारंपरिक रेल्वे यांच्यातील सुंदर मिलाफ तसेच यातील एक गॅप रॅपिडएक्स ट्रेनच्या माध्यमातून भरली जात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मेट्रोची रचना, परिचालन यांना काही मर्यादा आहेत. तसेच पारंपारिक रेल्वे, त्याचे परिचालन यातही वेगवेगळे प्रयोग केले जात असले तरी त्यात आणखी मोठी झेप घेण्यास वेळ लागू शकतो. मात्र, रॅपिडएक्सचे परिचालन मेट्रो ट्रेनसारखे असले तरी वेग आणि अन्य गोष्टींच्या बाबतीत ती पारंपरिक रेल्वेसारखी असेल. आताच्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या वंदे भारतचे एक मिनी व्हर्जन रॅपिडएक्स म्हणजेच नमो भारत ट्रेनमध्ये दिसेल, यात शंका नाही. नमो भारत ट्रेनमध्ये प्रवाशांना वंदे भारतची एक झलक नक्कीच दिसू शकते. किंबहुना या मार्गांचा आणि ट्रेन सेवांचा विस्तार होईल, तेव्हा वंदे भारतही प्रवासी विसरू शकतील. म्हणजेच एका अर्थाने नमो भारत ट्रेनसमोर वंदे भारत सामान्य वाटू लागेल. यापुढे आता वंदे भारत साधारण आणि स्लीपर वंदे भारत ट्रेन येणार आहेत.
नवीन ट्रेनसेवा, नामकरण आणि वाद
ट्रेन १८ सेवा सुरू होत असताना त्याचे नामकरण वंदे भारत असे करण्यात आले. यानंतर आता सुरू करण्यात आलेल्या रॅपिडएक्स ट्रेनचे नामकरण नमो भारत करण्यात आले आहे. मात्र, यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या ट्रेनच्या नामकरणावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसत आहेत. देशातील अनेक ठिकाणे, विमानतळे, रस्ते, योजना यांचे नामकरण गांधी कुटुंबावरून करण्यात येत असल्याबाबत काँग्रेसवर सातत्याने टीका केली जाते. मात्र, गेल्या काही वर्षातील नामकरणे पाहिल्यास सत्ताधारीही त्याच मार्गावरून जात असल्याचे पाहायला मिळत आहेत. मात्र, भारतीय रेल्वेच्या नवीन ट्रेनसेवा आणि त्याचे केले जात असलेले नामकरण हे वादाचे समीकरण होत आहे, हे स्पष्टच आहे.
शेवटी, ब्रिटिशांनी देशात रेल्वेसेवा आणली, हे सत्य असले तरी अनेक पावले पुढे जाऊन भारताने रेल्वेसेवेचा केलेला विस्तार केवळ शब्दातीत आहे. प्रचंड मोठे जाळे, व्याप भारतीय रेल्वे दररोज हाकत आहे. त्यात वंदे भारत, नमो भारत या ट्रेनसेवा हे क्रांतिकारी प्रकल्प भारतीय रेल्वेला जगाच्याही एक पाऊल पुढे नेण्यास अतिशय उपयुक्त ठरणारे आहेत. फ्रान्ससह अन्य काही देशांकडून वंदे भारत ट्रेनसारख्या सेवा आणि तंत्रज्ञानाची मागणी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. प्रवाशांनी कधी विचारही केला नसेल, असे प्रकल्प भारतीय रेल्वे प्रत्यक्षात साकारताना दिसत आहे आणि भविष्यात त्याची संख्या तसेच व्याप्ती वाढती राहील, यात शंका नाही.