'अल्पेश ठाकोर यांचा शिरच्छेद करणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 08:59 AM2018-10-15T08:59:51+5:302018-10-15T09:16:25+5:30
ठाकोर यांचा शिरच्छेद करणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आली आहे.
बहराइच - काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकोर हे गुजरातमध्येउत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांना मारहाण करुन त्यांना तेथून पळवून लावल्या प्रकरणी चर्चेत आले होते. उत्तर प्रदेशमध्ये ठाकोर यांचा शिरच्छेद करणाऱ्याला एक कोटीचे बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. महाराणी पद्मावती युथ ब्रिगेड’ संघटनेने यासंदर्भातील पोस्टर्स जिल्ह्यात ठिकठिकाणी लावले आहेत. पोलिसांनी हे पोस्टर्स हटवून समाजात असंतोष पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. एका हिंदी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.
अल्पेश ठाकोर आणि त्यांचे कार्यकर्ते हे राक्षसी प्रवृत्तीचे असून ते गरीब कामगारांना मारहाण करतात. हे लोक देश तोडण्याचे काम करीत आहेत. त्यांच्याविरोधात सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं ‘महाराणी पद्मावती युथ ब्रिगेड’चे राष्ट्रीय अध्यक्ष भवानी ठाकूर यांनी सांगितलं. तसेच ठाकोरचा शिरच्छेद करणाऱ्यांला आम्ही एक कोटीचे बक्षीस जाहीर केले असून त्यासंदर्भात जागोजागी पोस्टर्स लावले आहेत. जर ठाकोर गुजरात सोडून बाहेर जाणार नसतील तर आम्ही गुजरातमध्ये घुसून त्यांचे शिरच्छेद करू असे ठाकूर यांनी म्हटलं आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक अजय प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर बहराइचमध्ये अशा प्रकारचे पोस्टर्स लावण्यात आले. त्यानंतर हे पोस्टर्स जोरदार व्हायरल झाले असून हे प्रकरण गांभीर्याने घेण्यात आले आहे. तसेच समाजात असंतोष पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. पोस्टर्स हटवण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले असून पोस्टर्स लावणाऱ्यांची चौकशी करणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.