ऑनलाइन लोकमत,
चेन्नई, दि. ३ - मुसळधार पावसामुळे तामिळनाडूत पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, या कठिण काळात भारत सरकार पूर्णपणे तामिळनाडूतील जनतेसोबत आहे. तामिळनाडूच्या मदतीसाठी मी तात्काळ १ हजार कोटी देण्याचे निर्देश दिले आहेत असे चेन्नईतील पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
तमिळनाडू राज्याची राजधानी असलेल्या चेन्नईमध्ये झालेल्या विक्रमी पावसानंतर उद्भविलेल्या अस्मानी संकटाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेले आहेत. या संकटामुळे शेकडो मृत्युमुखी पडलेल्या तमिळनाडूमध्ये पुढच्या दोन तीन दिवसांत आणखी पाऊस होण्याचा अंदाज भारतीय वेधशाळेने वर्तविला असून, यामुळे चेन्नईमधील परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती आहे. चेन्नई, कांचीपुरम आणि तिरुवल्लुर येथील पूरग्रस्त परिस्थितीचा माहिती घेण्यासाठी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यादेखील या परिसराची हवाई पाहणी करणार आहेत.
नेवीच्या राजाली एयर स्टेशनवर उतरल्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललीता यांची भेट घेतली.
तामिळनाडूत मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीवर आज लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी माहिती दिली. पुरामुळे चेन्नईत आतापर्यंत २६९ जणांचा बळी गेल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केंद्राकडून पूर्ण सहकार्य तामिळनाडूला करण्यात येत आहे, असेही राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले. संसदेत बोलताना गृहमंत्री म्हणाले की ' १ ते २ डिसेंबर या २४ तासांच्या काळात राज्यात ३३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गेल्या १०० वर्षातील पावसाने गाठलेला हा उच्चांक आहे. तसेच हवामान विभागाने येत्या दोन ते दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
चेन्नईसह इतर भागांना पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकारनं ९४० कोटींच्या निधींची मदत जाहीर केली आहे. सध्या पाऊस थांबला असला तरी येत्या ४८ तासात पावसाचा जोर असाच कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.