महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर, संपूर्ण देशभरात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची चर्चा होताना दिसत आहे. यातच आता क्षत्रिय करणी सेनेने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या एनकाउंटरसाठी कथित बक्षिसाची घोषणा केल्याचे वृत्त आहे. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, संघटनेचे अध्यक्ष राज शेखावत यांनी एका व्हिडिओमध्ये लॉरेन्स बिश्नोईला मारणाऱ्या कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याला 1,11,11,111 रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा केली आहे.
"जो पोलीस कर्मचारी लॉरेन्स बिश्नोईचा एनकाउंटर करेल, त्याला ही बक्षिसाची रक्कम दिली जाईल, असे राज शेखावत यांनी बक्षिसाची घोषणा करताना म्हटले आहे. याच बरोबर, बिश्नोई हा देशासाठी धोका असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्र आणि गुजरात सरकारवरही निशाणा साधला आहे.
बिश्नोई सध्या अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात गुजरातच्या साबरमती कारागृहात आहे. गेल्या एप्रिल महिन्यात सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर झालेला गोळीबार आणि यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची झालेली हत्या, या दोन्ही प्रकरणात त्याचेच नाव समोर आले आहे. सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये क्षत्रिय करणी सेनेच्या प्रमुखांनी, लॉरेन्स बिश्नोई हा आमचे मौल्यवान रत्न आणि वारसा, अमर शहीद सुखदेव सिंह गोगामेडी यांचा खुनी आहे," असे म्हणाले आहे.
करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांची 5 डिसेंबर 2023 रोजी जयपूरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. यानंतर, काही तासांनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीने त्याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.