- सुरेश भटेवरा, नवी दिल्लीदुकानातला नोकर असो की बांधकाम क्षेत्रातील गवंडी, प्लंबर इत्यादींच्या हाताखाली काम करणारा सर्वसाधारण मजूर, दिवसभर घरकाम करणारी मोलकरीण असो की घरकामासाठी नेमलेला घरगडी या सर्व अकुशल कामगारांसाठी लवकरच किमान वेतनाचा कायदा लागू करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. प्रस्तुत विधेयकाचा मसुदा तयार आहे. कॅबिनेटच्या मंजुरीनंतर हे विधेयक संसदेच्या मंजुरीसाठी पाठवले जाईल.श्रम मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कामगार संघटनांशी चर्चा करून क्षम मंत्रालयाने अकुशल मजूर व कामगारांसाठी किमान वेतन विधेयकाचा मसुदा तयार केला आहे. प्रत्येक क्षेत्रातील अकुशल कामगारांना रोज किमान २00 ते ३00 रुपये मजुरीचा प्रस्ताव आहे. कामाचे तास व वेळेनुसार रक्कम ठरेल. केंद्रीय श्रमसचिव शंकर अग्रवाल म्हणाले की, अकुशल मजूर व कामगारांसाठी किमान वेतनाचे प्रस्तावित विधेयक कॅबिनेटकडे पाठवण्यात आले आहे. अनेक राज्यांत अकुशल मजुरांना अत्यंत कमी मजुरी मिळते. काम नसताना तर त्यांचे अधिकच शोषण होते. काही ठिकाणी निकृष्ठ दर्जाचे धान्य मजुरीऐवजी दिले जाते. अशा वातावरणात साऱ्या देशात अकुशल कामगार व मजुरांना किमान वेतन मिळायलाच हवे, अशी सरकारची इच्छा आहे. तथापि मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतरच अधिक तपशिलांसह त्यावर भाष्य करणे उचित ठरेल.
दिवसाला २00 ते ३00 रु. मजुरीचा प्रस्ताव
By admin | Published: February 21, 2016 12:56 AM