नवी दिल्ली - आखाती देशात काम करणाऱ्या एका कामगाराच्या मृत्यूनंतर 25 लाख रुपयांची नुकसान भरपाई मागणाऱ्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तब्बल दहा वर्षे चाललेल्या खटल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. 10 मे 2008 रोजी केरळमधील इस्माइल याचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता. त्याच्या पश्चात विधवा पत्नी, दोन लहान मुले आणि वृद्ध पिता असा परिवार होता. इस्माइलच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी 2008 साली क्लेम्स ट्रिब्युनलकडे 25 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती. त्यानंतर दहा वर्षे सुनावणी सुरू होती. अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने पीडितांच्या कुटुंबीयांना व्याजासहीत 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. नुकसान भरपाईची रक्कम वाढवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयासमोर कुठलीही बंधने नाहीत. कलम 168 अंतर्गत मोटार व्हेइकल अॅक्ट 1988 लागू झाल्यापासून न्यायालयन नुकसान भरपाईचे वाटप करत आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाला ही रक्कम वाढवण्याचा अधिकार आहे. अशी वाढली नुकसान भरपाईची रक्कम या खटल्यात ट्रिब्युनलने 11.83 लाख रुपये नुकसान भरपाई कुटुंबीयांना देण्याचे आदेश दिले होते. 7.5 टक्के व्याजासह ही रक्कम देण्याचे आदेश ट्रिब्युनलने दिले होते. नंतर केरळ उच्च न्यायालयाने ही रक्कम वाढवून 21.5 लाख रुपये केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कुटुंबाची परिस्थिती पाहून ही रक्कम 28 लाख केली. तसेच टक्के वार्षिक व्याजासह जोडून देण्यास सांगितले. त्यामुळे ही रक्कम 50 लाख रुपयांपर्यंत पोहोचली.
कुटुंबीयांनी मागितले 25 लाख, सर्वोच्च न्यायालयाने दिली 50 लाखांची भरपाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 3:35 PM