कर्नाटकमध्ये काँग्रेसने सत्ता स्थापन केल्यानंतर येथील जनतेला दिलेले वचन पूर्ण करण्याचं काम सुरू केलंय. यापूर्वी कर्नाटक सरकारने शक्ती योजनेच्या माध्यमातून महिलांना मोफत बससेवा देण्याचं वचन दिलं होतं. त्यानुसार, येथील महिलांना बससेवा मोफत पुरवण्यात आली आहे. आता, बेरोजगार तरुणांसाठी युवा निधी योजनेच्या माध्यमातून लाभ तरुणाईला आर्थिक आधार देण्याचं काम सुरू केलं आहे. मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांनी शिवमोग्गा येथून युवा निधी योजनेचा शुभारंभ केला. येथे प्रातिनिधिक स्वरुपात ६ लाभार्थी युवकांना चेकही वाटप करण्यात आले.
कर्नाटक सरकारने बेरोजगार युवकांना युवा निधी योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत सुरू केली आहे. त्यानुसार, पदवीधारक युवकांना दरमहा ३००० रुपये तर, डिप्लोमाधारक युवकांना १५०० रुपये प्रतिमाह बेरोजगार भत्ता देण्यात येणार आहे. सन २०२३-२४ या अकॅडमिक वर्षात पास झालेल्या आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर १८० दिवस म्हणजेच ६ महिने होऊनही अद्याप नोकरी न लागलेल्या युवकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. बेरोजगार युवकांना केवळ २ वर्षांसाठी हा बेरोजगार भत्ता देण्यात येणार असून नोकरी लागताच हा भत्ता बंदही केला जाणार आहे.
विशेष म्हणजे ज्या पदवीधारक युवकांना पुढील शिक्षणासाठी म्हणजे पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. दरम्यान, या योजनेसाठी कर्नाटक सरकारने चालू आर्थिक वर्षात २५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पुढील वर्षापासून या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर १२०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तर, २०२६ पासून या बेरोजगार भत्तासंदर्भातील युवा निधी योजनेसाठी तब्बल १५०० कोटी रुपये वार्षिक खर्च येणार आहे.