ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1- काश्मिर खोऱ्यातील अशांत परिस्थिती कायम ठेवण्यासाठी पाकिस्तान सैन्याकडून त्यांच्या वार्षिक बजेटच्या 5 टक्के रक्कम म्हणजेच 34 हजार कोटी रूपये दिले जाणार आहेत का? या विषयी चर्चा सुरू झाली आहे. इंटेलिजेन्स ब्युरोने तसं आपल्या अहवालात म्हटलं आहे. काश्मिर खोऱ्यातील अशांत परिस्थिती कायम राहावी, यासाठी पाकिस्तानी सेना त्यांच्या वार्षिक बजेटच्या पाच टक्के रक्कम देते आहे.
आईबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सैन्यदलाच्या बजेटपैकी मोठा वाटा काश्मिरमध्ये दहशतवाद पसरविण्यासाठी ठेवण्यात आला आहे. काश्मिरला पैशांची मदत पुरविण्याचा निर्णय पाकिस्तानच्या सैनदलाचा आहे. काश्मिर खोऱ्यात शांततेचं वातावरण पाकिस्तानी सैन्याला नको आहे. पाकिस्तानकडून देण्यात येणारी रक्कम विविध संघटनांसाठी वापरली जाणार आहे. काश्मिरमधील लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन आणि जैश-ए-मोहम्मद या तीन मोठ्या दहशतवादी संघटनांचं समर्थन पाकिस्तानकडून केलं जातं. या तीन्ही संघटनांवर पाकिस्तान खर्च करतो आहे. तसंच काश्मिर खोऱ्यातील फुटीरतावादी नेत्यांनासुद्धा पाकिस्तानकडून पैसा पुरवला जातो.
या संदर्भात नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सी अर्थात एनआयएने महत्त्वाचा तपास केला आहे. या तपासात अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काश्मिर खोऱ्यातील फुटीरतावादी नेत्यांना तिथे हिंसाचार पसरविण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून मोठी किंमत दिली जाते. बँकांमध्ये फेक खाती उघडून त्या खात्यांमध्ये पैसे जमा केले जातात तर काही रक्कम हवाला मार्फत नेत्यांपर्यंत पोहचवली जाते. एनआयएकडून या संदर्भात एफआयआर फाइल केला जाणार आहे. एनआयएने आपल्या तपासादरम्यान काश्मिर खोऱ्यातील ज्या लोकांना पाकिस्तानकडून पैसा पुरवला जातो अशा लोकांशी संवाद साधला आहे.