नवी दिल्ली : भारतासह संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
कोरोनामुळे दिल्लीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. देशात कोरोनाचा हा दुसरा बळी ठरला. शुक्रवारी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात या 69 वर्षीय महिलेवर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या महिलेला तिच्या मुलाकडून कोरोनाचा संसर्ग झाला. महिलेचा मुलगा काही दिवसांपूर्वीच जपान, जिनिव्हा आणि इटलीमधून प्रवास करून मायदेशी परतला होता. सुदैवाने त्यांच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांना कोरोनाची बाधा झालेली नाही. याचबरोबर, याआधी तीन दिवसांपूर्वी कर्नाटकातील कलबुर्गी येथे कोरोनामुळे एका 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ही देशातील पहिली घटना आहे. मोहम्मद हुसैन सिद्दिकी असे या मृतकाचे नाव आहे.
दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच, केंद्र सरकारने कोरोनाला भारतातील उद्रेकाला राष्ट्रीय संकट घोषित केले आहे. यामुळे देशातील सर्व राज्यांमधील सरकारे आता कोरोनाशी सामना करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून (एसडीआरएफ) मदत मिळवू शकतात, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
देशात कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा 80 हून अधिक आहे. यामध्ये 17 परदेशी नागरिक आहेत. महाराष्ट्रात 19 जणांनी कोरोनाची बाधा झाली आहे. तर केरळमध्ये 22, हरयाणात 15, उत्तर प्रदेशात 11, कर्नाटकात 7, राजस्थान, लडाखमध्ये प्रत्येकी 3, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पंजाब, जम्मू काश्मीरमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे.