ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - शीसे आढळल्याने मॅगीवर बंदी घातल्यानंतर आता सरकारने मॅगीचे उत्पादन करणा-या नॅस्ले इंडियाला ४२६ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याची तयारी सुरु केली आहे. मॅगीवरील बंदीने नॅस्लेला अगोदरच ३६० कोटी रुपयांचा फटका बसला असून हा दंड ठोठावला गेल्यास नॅस्ले इंडियाला मोठा हादरा बसेल अशी शक्यता आहे.
केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. भारतातील ग्राहकांच्या मार्फत ही तक्रार नोंदवली जाणार असून कंपनीने ग्राहकांची दिशाभूल केल्याचा, नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा तक्रारीत केला जाणार आहे. यासाठी नॅस्ले इंडियाला सुमारे ४२६ कोटी रुपयांचा दंड आकारण्याची मागणी केली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
उत्तरप्रदेशमधील बाराबाँकी येथे मॅगीच्या नमून्यांमध्ये मर्यादेपेक्षा जास्त शिसे आढळल्यापासून मॅगीवर देशभरात बंदी घालण्यात आली आहे. याविरोधात नॅस्लेने मुंबई हायकोर्टात धाव घेतली असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. मात्र केंद्र सरकारच्या या आक्रमक भूमिकेमुळे नॅस्ले इंडियाची झोप उडवली असेल एवढे मात्र नक्की.