नाशिक- नाशिकमधील करन्सी नोट प्रेसमध्ये 500, 200, 100 आणि 20 रुपयांच्या नोटांची छपाई 44 टक्क्यांनी घटल्याची बाब समोर आली आहे. तर 500 रुपयांच्या नोटांती छपाई गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात थांबविण्यात आली. त्याचबरोबर 200, 100 आणि 20 रुपयांच्या नोटांची छपाई 1 एप्रिलपासून थांबविण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
नाशिकमधील करन्सी नोट प्रेसने 2017-18 या आर्थिक वर्षासाठी आरबीआयने दिलेलं 1800 दशलक्ष नोटा छापण्याचं टार्गेट पूर्ण केल्याने 500 रुपयांच्या नोटेची छपाई बंद केली आहे. याचबरोबर वीस आणि शंभराच्या नोटांची नवीन डिझाइन केंद्र सरकारने अद्याप मंजूर न केल्यामुळे या नोटांची छपाई नाशिकरोड प्रेसमध्ये 1 एप्रिलपासून थांबली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मध्य प्रदेशातील देवास करन्सी नोट प्रेसला 200 रुपयांच्या नोटा छापण्याचे आदेश दिल्याने नाशिकमधील प्रेसने 200 रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली आहे. नाशिकमधील प्रेस सध्या 10 व 50 रुपयांच्या नोटांची छपाई करते आहे. नोटांच्या छपाईमध्ये घट झाली आहे. आधी 18 दशलक्ष नोटा छापल्या जायच्या पण आता 10 दशलक्ष नोटा छापल्या जातात. एप्रिल 16 पासून नाशिकमधील प्रेसने 500 रुपयांच्या नोटा पुन्हा छापायला सुरूवात केली आहे, पण उत्पादन अत्यंत कमी आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे.