नवी दिल्ली: मोदी सरकार लवकरच 75 रुपयांचं नाणं चलनात आणणार आहे. सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेयरमध्ये तिरंगा फडकावलेल्या घटनेला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर नेताजींच्या स्मरणार्थ 75 रुपयांचं नाणं चलनात आणलं जाईल. अर्थ मंत्रालयानं याबद्दलची अधिसूचना जारी केली आहे. पोर्ट ब्लेयरमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा तिरंगा फडकावला, त्या घटनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या घटनेच्या स्मरणार्थ केंद्र सरकार 75 रुपयांचं नाणं चलनात आणेल, असं अर्थ मंत्रालयानं अधिसूचनेत म्हटलं आहे. सध्या या नाण्याची निर्मिती सुरू आहे. या नाण्याचं वजन 35 ग्रॅम असेल. यासाठी 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबं आणि प्रत्येकी 5-5 टक्के निकेल आणि जस्त वापरण्यात येईल. सेल्युलर जेलच्या समोर तिरंग्याला वंदन करणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं चित्र या नाण्यावर असेल. त्या खाली 30 डिसेंबर 1943 या तारखेचा उल्लेख असेल. नेताजींनी याच दिवशी पोर्ट ब्लेयरच्या सेल्युलर जेलबाहेर तिरंगा फडकावला होता. सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ पंतप्रधान मोदींनी 21 ऑक्टोबरला लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावला होता. आझाद हिंद सेनेच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण झाल्यानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
नेताजींच्या स्मरणार्थ सरकार आणणार 75 रुपयांचं नाणं; लवकरच येणार चलनात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 9:11 AM