बंगळुरू : बंगळुरू पोलिसांनी एका मोठ्या आणि धक्कादायक सायबर गुन्ह्याचा पदार्फाश केला आहे. तब्बल ८५४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले असले तरी भय इथेच संपत नाही. कारण गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे ओतलेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. फसवणूक करणार्यांच्या टोळीने पीडितांना व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामद्वारे आमिष दाखवले. ही टोळी बंगळुरूच्या यालाहंका परिसरात 1 BHK भाड्याच्या घरातून हा कारभार सांभाळत होती. यासह आरोपी आठ मोबाईल फोन आणि ८४ बँक खाती वापरत होते.
दरम्यान, गुंतवणूक योजनेच्या बहाण्याने भारतातील हजारो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. फसवणूक झालेल्या एकूण रकमेपैकी पाच कोटी रुपये गोठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. खरं तर अटक करण्यात आलेल्या सहा जणांपैकी ३३ वर्षीय एमबीए पदवीधर आणि ३६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर यांनी दोन वर्षांपूर्वी यालाहंका परिसरातील एका घरातून खासगी उपक्रम सुरू केला होता.
गुंतवणूक योजनेच्या बहाण्याने फसवणूक सुरुवातीला नफा म्हणून दररोज १ ते ५ हजार रुपये मिळतील या बहाण्याने आरोपींनी १,००० रुपये ते १०,००० रुपयांपर्यंतची छोटी गुंतवणूक करण्यास सांगितली, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. हजारो पीडितांनी १ लाख ते १० लाख किंवा त्याहून अधिक रकमेची गुंतवणूक केली, असेही त्यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी गुंतवणूक म्हणून दिलेले पैसे आरोपींनी ऑनलाइन पेमेंटद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यात टाकले. तसेच गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधितांनी जेव्हा रक्कम काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना कधीही परतावा मिळाला नाही. रक्कम जमा केल्यानंतर आरोपींनी पैसे मनी लाँड्रिंगशी संबंधित खात्यात वळवून आपला खिसा भरण्याचा प्रयत्न केला. एकूण ८५४ कोटींची रक्कम विविध ऑनलाइन पेमेंट ॲपवर टाकण्यात आल्याचे उघड झाले आहे.