नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाने राजकोट येथील सहकारी बँकेतील ८७१ कोटी रुपयांचे संगती न लागणारे व्यवहार उघडकीस आणले असून ४५०० नवी खाती या बँकेत उघडण्यात आली असून त्यातील पाच डझनपेक्षा जास्त खातेदारांनी दिलेला मोबाईल फोन क्रमांक एकच आहे. हा आठ नोव्हेंबरनंतर काळा पैसा कायदेशीर करून घेण्याचा सगळ््यात मोठा प्रकार असावा. प्राप्तिकर विभागाच्या अहमदाबादेतील चौकशी शाखेने कर कायद्याअंतर्गत कारवाई सुरू केली असून बँकेकडून सगळा तपशील मागवला आहे. त्या आधी प्राप्तिकर विभागाने बँकेच्या व्यवहारांची पाहणी केली होती व त्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळली होती. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही केलेल्या चौकशीत आतापर्यंत या बँकेत जमा करण्यात आलेले ८७१ कोटी रुपये ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीतील व ५०० व एक हजार रुपयांच्या बाद झालेल्या नोटांचे आढळले. याच कालावधीत १०८ कोटी रुपये संशयास्पदरित्या काढून घेतल्याचेही आढळले. हे पैसे काढणे किंवा भरणे हे व्यवहार २०१५ किंवा इतर वेळच्या बँकेच्या व्यवहारांशी मिळतेजुळते नाहीत.५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्यानंतर २५ असे व्यवहार समोर आले आहेत की त्यात खूप मोठ्या संख्येने बँकेत पैसे भरले गेले. ३० कोटी रुपयांचे व्यवहार हे संशयास्पद व असमाधानकारक पद्धतीचे तसेच ज्या खात्यांनी केवायसीची समाधानकारक पूर्तता केलेली नाही असे झाले आहेत.
सहकारी बँकेत ८७१ कोटींचा गैरव्यवहार
By admin | Published: January 09, 2017 1:37 AM