नवी दिल्ली : रिलायन्स जिओने केवळ ९९९ रुपयांचा जिओ फोन बाजारात दाखल केला असून, त्यासाठी मासिक केवळ १२३ रुपयांचा रिचार्ज प्लॅन आहे. यामध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलशिवाय, ग्राहकांना १४ जीबी डेटादेखील मिळेल. याद्वारे २जी फोन वापरणाऱ्या २५ कोटी ग्राहकांना आकर्षित करण्याचा जिओचा प्रयत्न आहे. त्यामुळे दूरसंचार क्षेत्रात उलथापालथ होण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. जेपी मॉर्गनने म्हटले की, जिओची ही मोहीम २जीची दरवाढ थांबवण्याची शक्यता आहे. याचा फटका एअरटेलला बसेल. पुढील १८ महिन्यांत दरवाढीची शक्यता संपेल, असे मॉर्गनने म्हटले.
नेमका फटका कुणाला?
२०१८ मधील जिओ फोनपेक्षा सध्या सादर करण्यात आलेला जिओ भारत फोन बाजारात उलथापालथ करण्यासाठी पुरेसा आहे. फोन उत्तम कामगिरी करत असल्यास १० कोटींपेक्षा अधिक जण जिओ फोन घेतील. व्होडाफोन आयडिया व एअरटेलकडे २जीचे अनुक्रमे १०.३ कोटी व ११.१ कोटी ग्राहक आहेत. जर यातील ४०% ग्राहकांनी जरी जिओ भारत फोन घेतला तर दोन्ही कंपन्यांच्या मोबाइल कमाईवर मोठा परिणाम होईल.