नवी दिल्ली : राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चार सदस्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, सभापती एम. व्यंकय्या नायडू आणि सभागृहाच्या सदस्यांनी भावी जीवनासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. राजकीय जीवन आणि सभागृहातील अनुभव या आधारावर ते जनकल्याण आणि देशाच्या विकासासाठी आपले योगदान देत राहतील, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. आझाद यांच्यासोबत भाजपचे शमशेर सिंह मन्हास, पीडीपीचे मीर मोहम्मद फय्याज व नजीर अहमद लवाय यांचा कार्यकाळही समाप्त होत आहे. यावेळी मोदी आणि गुलाम नबी आझादही काही क्षणांसाठी भावूक झाले होते. आझाद यांच्यासोबतच्या आपल्या जुन्या मैत्रीचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, आझाद असे नेते आहेत जे आपल्या पक्षासह सभागृह आणि देशाची काळजी करत असतात. दोन्ही सभागृहांतील आझाद यांच्या कार्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, त्यांची विनम्रता, शांतता आणि देशासाठी काही करण्याची इच्छा कौतुकास्पद आहे. आझाद यांची ही कटिबद्धता त्यांना आगामी काळातही शांत बसू देणार नाही. त्यांचा अनुभवाचा देशाला लाभ होत राहील. मोदी म्हणाले की, आझाद हे जेव्हा काश्मीरचे मुख्यमंत्री होते, तेव्हा आपण गुजरातचे मुख्यमंत्री होतो. त्यावेळी काश्मिरात अतिरेक्यांनी हल्ला केला होता. यात गुजरातचे काही पर्यटक मारले गेले होते. आझाद यांनी फोन करून आपल्याला याची माहिती दिली. कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आझाद यांनी गुजरातच्या त्या लोकांची काळजी घेतली. यावेळी पंतप्रधान अतिशय भावूक झाले. त्यानंतरच्या भाषणात आझाद यांनाही आपले अश्रू आवरणे कठीण झाले. आझाद यांनी सांगितले की, त्यावेळी घटनेनंतर आपण विमानतळावर गेलो तेव्हा पीडित कुटुंबातील मुले माझ्याजवळ येऊन खूप रडले. हे दृश्य पाहून माझ्या तोंडून शद्ब निघाले की, या देशातून दहशतवाद समाप्त व्हायला हवा. आठवलेंनी दिली आझाद यांना ऑफर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी खास शैलीत आझाद यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, काँग्रेस तुम्हाला पुन्हा राज्यसभेवर संधी देणार नसेल तर आम्ही तयार आहोत. हे ऐकून आझाद यांना हसू आलं. हिंदुस्थानी मुस्लिम असल्याचा अभिमान गुलाम नबी आझाद म्हणाले की, मी नशिबवान आहे की, कधी पाकिस्तानात गेलो नाही. पण, मी जेव्हा तेथील परिस्थितीबाबत वाचतो, ऐकतो तेव्हा मला याचा अभिमान होतो की, आम्ही हिंदुस्थानी मुस्लिम आहोत. जगात जर कुणा मुस्लिमांना अभिमान असायला हवा, तर तो हिंदुस्थानी मुस्लिमांना असायला हवा. पाकिस्तानचा उल्लेख करून ते म्हणाले की, तिथे ज्या सामाजिक समस्या आहेत, त्या भारतात नाहीत. मी अशी प्रार्थना करतो की, या देशातून दहशतवाद समाप्त व्हावा. काश्मिरी पंडितांचा उल्लेख करून ते म्हणाले की, मी जेव्हा विद्यार्थीदशेत राजकारणात होतो, तेव्हा मला सर्वाधिक मते काश्मिरी पंडितांचीच मिळत होती. काश्मिरी पंडितांना पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी मोदी आणि शहा यांना केले.
सदस्यांना निरोप देताना राज्यसभेत मोदी झाले भावुक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 6:46 AM