ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - मुस्लीमविरोधी अशी प्रतिमा पुसण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा RSS शी संबंधित संघटनेने 2 जुलै रोजी भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. पाकिस्तानसह अनेक मुस्लीम राष्ट्रांच्या राजदूतांना निमंत्रित करण्यात आले आहे. भारत दंगलमुक्त करण्याचा आणि एकात्मतेचा संदेश या माध्यमातून देण्याचा संघाचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे.
मुस्लीम राष्ट्रीय मंच या संघाशी संबंधित संघटनेने या इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. यंदा ही पार्टी खूपच भव्य असेल असे संकेत मिळत आहेत. याखेरीज देशभरात लहान लहान इफ्तार पार्ट्या आयोजित कराव्यात असा संदेशही कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
जगाल भारतीयत्व म्हणजे काय ते सांगावं, भिन्न समाज येथे शांततेत एकत्र राहू शकतात हे सांगावं आणि मुस्लीम जगतासाठी भारत हा शांतता आणि आशेचा किरण असेल हा संदेश जावा यासाठी ही इफ्तार पार्टी आयोजित करण्यात येणार असल्याचे संघाचे नेते आणि मंचचे प्रमुख इंद्रेश कुमार यांनी सांगितले.
सगळ्या प्रकाराच्या समाजातील लोकांनी एकत्र यावे आणि लहान लहान इफ्तार पार्ट्यांमध्ये सहभागी व्हावे असा सल्ला सदस्यांना देण्यात आल्याचेही कुमार म्हणाले. धर्मग्रंथांचा आधार घेत इंद्रेश कुमार यांनी प्रेषितानेदेखील शांतता व प्रेम यांचा संदेश भारतातून येईल असा संदेश दिल्याचे सांगितले. सगळ्यांनी मिळून मिसळून रहावे आणि दहशतवाद व दंगलींपासून देश मुक्त व्हावा अशी अपेक्षा इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केली आहे.
यंदाच्या इफ्तार पार्टीमध्ये 35 ते 40 मुस्लीम देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आल्याचे कुमार यांनी सांगितले आहे.