नितीन अग्रवाल नवी दिल्ली : दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात फटाक्यांवर बंदी आणण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी संघटनांना आवडलेला नाही. हजारो लोकांच्या रोजीरोटीशी संबंधित या प्रश्नावर पुनर्विचार करण्याची मागणी स्वदेशी जागरण मंचने केली आहे, तर विश्व हिंदू परिषदेने हा मुद्दा धार्मिक भावनांशी जोडला आहे.स्वदेशी जागरण मंचचे सहसंयोजक अश्विनी महाजन म्हणाले की, फटाक्यांच्या व्यवसायावर अनेक लोक अवलंबून आहेत. त्यामुळे प्रदूषण होत असले तरी चिनी फटाक्यांनी अधिक नुकसान होते. चिनी फटाक्यांवर नियंत्रण ठेवण्यात सरकार अपयशी ठरले असून, त्याचा फटका सर्व नियम पाळणाºया भारतीय फटाका व्यवसायाला बसायला नको. या निर्णयाचा सर्वाधिक फटका किरकोळ व्यापाºयांना बसणार आहे. त्यांनी आधीच फटाके खरेदी करून ठेवले आहेत.विहिंपचे संयुक्त महासचिव सुरेंद्र जैन यांनी न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करण्यास नकार देत स्पष्ट केले की, हल्ली दिवाळीपेक्षा नववर्षाच्या स्वागताला अधिक फटाके वाजविले जातात. हिंदू परंपरांवर प्रश्न उपस्थित करणे हल्ली फॅशन झाले आहे. प्रदूषणाची आठवण हिंदू परंपरांच्या संदर्भातच येते. बकरी ईदच्यावेळीही प्रदूषण होतेच. यावरही विचार केला जावा.शेतीतील काडीकचरा जाळणे हे प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. हे रोखण्यासाठी सरकारने योजना तयार करावी. विशेष म्हणजे दिवाळीच्या आसपासच दिल्लीच्या आजूबाजूच्या राज्यांत मोठ्या प्रमाणात काडीकचरा जाळण्यात येतो. त्यावर लक्ष दिल्यास दिल्लीतील प्रदूषण कमी होईल, असे महाजन यांनी सांगितले.
फटाक्यांवरील बंदीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विहिंप नाराज; पुनर्विचार करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:43 AM