केरळमधील पलक्कडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय समन्वय बैठकीला सुरुवात झाली आहे. शनिवारी (31 ऑगस्ट) सरसंघचालक मोहन भागवत यांनी दीप प्रज्वलन करून बैठकीचा शुभारंभ केला. या बैठकीला सर्व 32 संलग्न संघटनांचे पदाधिकारी उपस्थित आहेत. संघप्रमुख मोहन भागवत यांच्यासह सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे व्यासपीठावर उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला वायनाडमध्ये नुकत्याच झालेल्या भूस्खलनासंदर्भातील माहिती आणि स्वयंसेवकांनी केलेल्या सेवा कार्याची माहिती सर्व प्रतिनिधींना देण्यात आली. या बैठकीत विविध संघटनांचे कार्यकर्ते कामाची माहिती आणि अनुभवांचे आदान-प्रदान करतील.
या विषयांवर होऊ शकते चर्चा -या समन्वय बैठकीत राष्ट्रीय मुद्यांबरोबरच पश्चिम बंगाल सारख्या अनेक राज्यांतील महत्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकते. या बैठकीला भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि सरचिटणीस बी.एल.संतोषही उपस्थित राहतील. मोदी सरकार 3.0 च्या स्थापनेनंतर संघाची ही पहिलीच समन्वय बैठक आहे. या बैठकीत विविध विषयांवर परस्पर सहकार्य आणि समन्वय वाढविण्यासंदर्भात आवश्यक उपाय योजनांवरही चर्चा केली जाईल.
काय म्हणाले प्रचार प्रमुख? - प्रचार प्रमुख सुनील आंबेडकर म्हणाले, "आम्ही केरळमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची बैठक घेत आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 90 सदस्यांसह 32 संघटनांचे 320 सदस्य या बैठकीत विचारविनिमय करतील. आम्ही निमंत्रितांकडून (राष्ट्रीय अध्यक्ष, संस्थेचे सचिव, पदाधिकारी) फीडबॅक घेऊ आणि जमिनीवरील परिस्थितीवर चर्चा करू. प्रत्येक संस्था त्या-त्या क्षेत्रातील अनुभव, त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि त्यांच्या निरीक्षणांचे आदान प्रदानही करतील."
आंबेकर पुढे म्हणाले, "राष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे मुद्दे, राष्ट्रीय सुरक्षा, वर्तमान काळातील मुद्दे, घटना घडामोडी, काही राज्यांचे मुद्दे, काही राज्यातील चिंताजनक मुद्दे आदींवर चर्चा केली जाईल. समन्वय आणखी चांगला कशा प्रकारे करता येईल यावरही चर्चा होईल. तीन दिवसांत अेक सत्र होतील." या शिवाय, "आम्ही 2025 विजयादशमी ते 2026 विजयादशमी पर्यंत शताब्दी वर्ष साजरे करणार आहोत, याअंतर्गत आम्ही मोठ्या प्रमाणावर सामाजिक परिवर्तनाचे मुद्दे मांडणार आहोत. पंच परिवर्तनावर काम केले जाईल. यात, सामाजिक समरसता, कुंटुंब जागरण, पर्यावरणविषयक समस्या, आत्मसन्मान आणि नागरी कर्तव्य यांचा समावेश असेल. विजयादशमी 2025 रोजी हे पाचही उपक्रम आरएसएसकडून मोठ्या प्रमाणावर सुरू केले जातील," असेही ते म्हणाले.