राजकोट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केशुभाई पटेल व विजय रूपाणी असे तीन तगडे मुख्यमंत्री देणाऱ्या राजकोट पश्चिम मतदारसंघात भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक असणाऱ्या परिवारातील डॉ.दर्शिता शाह यांना उमेदवारी दिली आहे. शाह यांच्यासाठी माजी मुख्यमंत्री व सीटिंग आमदार रूपाणी यांचे तिकीट कापले. काँग्रेसने येथे ‘पाटीदार’ कार्ड खेळले असले, तरी कॅडर व्होट आणि विकासकामांच्या भरवशावर कमळच फुलण्याची चिन्हे आहेत. ५० वर्षांपासून हा भाजपचा गड आहे. येथे उमेदवार नाही, तर भाजप निवडून येते, असा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे. त्यामुळेच शहा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय काहीच चुकीचा नाही, असे कार्यकर्ते बोलून दाखवितात.
विजयाचा सूर्य तळपण्याची चिन्हेकाँग्रेसने कडवा पाटीदार समाजाचे माजी नगरसेवक मनसुख कालरिया यांना रिंगणात उतरविले आहे, तर आपने मंडप डेकोरेशेनचे व्यावसायिक दिनेश जोशी यांना संधी दिली आहे. भाजपच्या भक्कम शक्तीपुढे काँग्रेस आणि आपकडून मांडले जात असलेले महागाई व बेरोजगारीचे मुद्दे या मतदारसंघात फिके पडताना दिसतात. त्यामुळे पश्चिम राजकोटमध्ये यावेळीही भाजपचा सूर्य मावळण्याची चिन्हे नाहीत.
असा आहे इतिहास...१९७५ मध्य केशुभाई पटेल येथून जिंकले व मुख्यमंत्री झाले.नरेंद्र मोदी यांची गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर, फेब्रुवारी, २००२च्या पोटनिवडणुकीत मोदीही येथूनच पहिल्यांदा निवडून आले.विजूभाई वाला यांची राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर रिक्त जागेसाठी २०१४ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी होत विजय रूपाणी हे मुख्यमंत्री झाले.२०१७ मध्ये पुन्हा विजय विजय रूपाणी येथून विजयी झाले व पुढे मुख्यमंत्री झाले.
पूर्व राजकोटमध्ये काँग्रेसला उद्याची संधी- पूर्व राजकोट मतदारसंघात भाजपने आणखी एक धाडसी निर्णय घेत, माजी वाहतूकमंत्री अरविंद रयाणी यांचे तिकीट कापले. येथे भाजपने जातीय समीकरणाच्या आधारावर ओबीसी कार्ड खेळत, भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष उदय कानगड यांना उमेदवारी दिली आहे. - येथे काँग्रेसने इंद्रनील राज्यगुरू या गद्दावर माजी आमदाराला पुन्हा संधी दिली आहे. २०१२ मध्ये पूर्वमधून आमदार झालेल्या राज्यगुरू यांना २०१७ मध्ये माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना त्यांच्या पश्चिम मतदारसंघात आव्हान दिले होते. - राज्यगुरू हे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून आपली घोषणा होईल, या आशेने आम आदमी पक्षात गेले होते, पण तसे न घडल्यामुळे १५ दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये परतले. राज्यगुरू हे काँग्रेसपेक्षा स्वत:बळावर भाजपला फाइट देत आहेत. ‘आप’ने लेहुआ पाटीदार समाजाचे राहुल भुवा यांच्यावर डाव खेळला आहे.