नवी दिल्ली - सोशल मीडियावर ख्यातनाम व्यक्तींच्या नावाचा वापर करुन बनावट अकाऊंटद्वारे भावना भडकवणाऱ्या पोस्ट मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. या प्रकरणांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे ख्यातनाम व्यक्तींविरोधात कोर्टात खटले दाखल करण्यात येत असल्यानं त्यांना बदनामीचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाही याद्वारे टार्गेट करण्यात आले आहे. नुकतेच सरसंघचालक मोहन भागवत यांच्याही नावाचा वापर करुन सोशल मीडियावर बोगस अकाऊंट बनवण्यात आले आहे.
अनुसूचित जाती व जमातींसंदर्भात सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट टाकल्याप्रकरणी सरसंघचालक मोहन भागवतांविरोधात फौजदारी खटला दाखल करावा, असे निर्देश जोधपूरच्या एससीएसटी कोर्टानं पोलिसांनी दिले आहेत. कोर्टानं उदयमंदिर पोलीस स्टेशनला यासंबंधीचे निर्देश देण्यात आले आहेत. सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट करणाऱ्यांविरोधात राजस्थानमधील पाली येथील नरेंद्र कुमार यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. ज्यामध्ये मोहन भागवत यांच्यासह अनेक दिग्गज व्यक्तींच्या नावाचा समावेश आहे.
दरम्यान, सरसंघचालक मोहन भागवत यांचे सोशल मीडियावर अकाऊंटच नाही. अशातच त्यांच्या नावाचा वापर करुन बनावट अकाऊंटद्वारे भावना भडकवणाऱ्या पोस्ट प्रचंड प्रमाणात करण्यात आल्या आहेत. जोधपूरच्या एससीएसटी कोर्टानं अशा आक्षेपार्ह, आपत्तीजनक आणि जातिवाचक पोस्ट करणा-यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर कोणत्याही प्रकराचे अकाऊंट नसल्यामुळं मोहन भागवताविरोधात गुन्हा दाखल होणार नाही, असे म्हटले जात आहे.