चित्रकूट येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय हिंदू एकता महाकुंभमध्ये, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी हिंदू धर्म सोडून गेलेल्यांची घरवापसी करण्याचे आवाहन केले. याचवेळी, भय अधिक काळ बांधून ठेऊ शकत नाही. अहंकारामुळे एकता संपुष्टात येते. आपण लोकांना जोडण्याचे काम करू, असेही मोहन भागवत म्हणाले. यावेळी त्यांनी महाकुंभमध्ये उपस्थित असलेल्यांना याचा संकल्पही दिला.
लोक शपथ घेत मोहन भागवतांसोबत म्हणाले, 'मी हिन्दू संस्कृतीचा धर्मयोद्धा, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम यांच्या संकल्प स्थळावर सर्वशक्तिमान परमेश्वराला साक्षी माणून शपथ घेतो की, मी आपला पवित्र हिन्दू धर्म, हिन्दू संस्कृती आणि हिन्दू समाजाचे संरक्षण, संवर्धन आणि सुरक्षिततेसाठी आजीवन कार्य करेल. मी प्रतिज्ञा करतो, की कुण्याही हिंदू बंधूला धर्मातून बाहेर जाऊ देणार नाही. तसेच जे बंधू धर्म सोडून गेले आहेत, त्यांच्याही घरवापसीसाठी कार्य करेन. त्यांना कुटुंबाचा भाग बनवेन. मी प्रतिज्ञा करतो की, हिंदू बहिणींची अस्मिता, सन्मान आणि शीलाचे रक्षण करण्यासाठी सर्वस्व अर्पण करेन. जाती, वर्ग, भाषा आणि पंथ भेद सोडून हिंदू समाजाला समरस, सशक्त आणि अभेद्य बनविण्यासाठी संपूर्ण शक्तीनिशी कार्य करेन.'
विशेष म्हणजे, चित्रकूटमधील या हिंदू महाकुंभाची सुरुवात मंगळवारी 1100 शंखांच्या शंख नादाने झाली. या महाकुंभात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशिवाय देशातील अनेक दिग्गज लोक उपस्थित आहेत. तुलसीपीठाधीश्वर श्री रामभद्राचार्य महाकुंभाचे आयोजन करत आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित राहणार आहेत. श्री श्री रविशंकर यांनीही कार्यक्रमाला संबोधित केले. काही लोक जमले, की भीती वाटते. मात्र, जेथे संत आणि हिंदू एकत्रित येतात, तिथे अभय असते. याच बरोबर, देशभक्ती आणि ईश्वर भक्ती एकच आहे. जो देशभक्त नाही, तो ईश्वर भक्तही होऊ शकत नाही, असेही रविशंकर यावेळी म्हणाले.