नवी दिल्ली: सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय सैन्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका सुरू आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील ट्विट करून मोहन भागवत यांना लक्ष्य केले आहे. सरसंघचालकांचे वक्तव्य हा प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे. त्यांनी आजपर्यंत देशासाठी शहीद झालेल्या प्रत्येकाच्या बलिदानाचा अनादर केला आहे. भारतीय सैन्याचा केलेला हा अपमान केवळ त्यांच्यापुरताच मर्यादित नसून तो भारतीय राष्ट्रध्वजाचाही अपमान ठरतो. सैन्याचा आणि शहिदांचा असा अपमान करणाऱ्या मोहन भागवत यांची लाज वाटते, अशा शब्दांत राहुल यांनी आपला संताप व्यक्त केला.
मोहन भागवत यांनी रविवारी मुजफ्फरपूर येथे संघाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी म्हटले होते की, आमची सैन्य तयार करण्याची क्षमता आहे. पण ही आमची लष्करी संघटना नाही. तर ही कौटुंबीक संघटना आहे. पण संघात लष्करासारखीच शिस्त आहे. देशाला गरज असेल आणि संविधानाने परवानगी दिली तर आम्ही सीमेवर लढायला तयार आहोत. संघ स्वयंसेवक हसतहसत बलिदान द्यायला तयार आहेत, असे भागवत यांनी सांगितले. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. भागवत यांचे वक्तव्य लष्कराचे खच्चीकरण करणारे असून हा लष्कराचा अपमान आहे. त्याबद्दल भागवत यांनी माफी मागायला हवी, अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाचे राज्य प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोहन भागवत यांनी भारतीय सैन्याचा अपमान केल्याचा आरोप केला. भारतीय सैन्याच्या क्षमतेवर अशाप्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही. याबद्दल संघाने भारतीय लष्कराची माफी मागितली पाहिजे, असे नवाब मलिक यांनी म्हटले.