नवी दिल्ली - देशातील आरक्षण व्यवस्थेबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असते. दरम्यान, सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाबाबत पुन्हा एकदा वक्तव्य केल्याने त्यावरून नवा वाद उदभवण्याची शक्यता आहे. एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाचे समर्थक आणि विरोधकांनी याविषयी सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. रविवारी एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना भागवत म्हणाले की,''जे लोक आरक्षणाच्या बाजूने आहेत आणि जे विरोधात आहेत, अशांनी याविषयी सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा केली पाहिजे. या संदर्भात मी याआधीही वक्तव्य केले होते. मात्र त्यावेळी खूप विवाद होऊन मूळ मुद्दा भरकटला होता. जे आरक्षणाच्या बाजूने आहेत त्यांनी आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्यांचे हित विचारात घेऊन बोलले पाहिजे. तसेच जे आरक्षणाच्या विरोधात आहेत त्यांनी आरक्षणाच्या समर्थकांची बाजू समजून घेतली पाहिजे.'' दरम्यान, 2015 मध्ये बिहारमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी मोहन भागवत यांनी आरक्षणाच्या धोरणाचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे मत मांडले होते. मात्र भागवत यांच्या या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले होते. तसेच राजकीय पक्ष आणि विविध जातीय संघटनांनी त्याला तीव्र विरोध केला होता. विशेषत: बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी सरसंघचालकांच्या विधानाविरोधात रान उठवले होते. तसेच कुणामध्ये हिंमत असेल त्याने आरक्षण रद्द करून दाखवावे, असे आव्हान लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालकांना दिले होते. त्यावेळी सरसंघचालकांचे हे विधान भाजपाला खूप महागात पडले होते. त्यामुळे बिहारमधील राजकीय समीकरणे बदलून भाजपाला दारुण पराभव पत्करावा लागला होता. आता महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भागवत यांनी हे वक्तव्य केल्याने आरक्षणावरून पुन्हा एकदा भाजपाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
आरक्षणावरील चर्चेबाबत सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले मोठे विधान, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 2:14 PM