देहरादून: गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी त्यांच्या विधानांमुळे चर्चेत आहेत. गडकरी त्यांच्या वक्तव्यांमधून अप्रत्यक्षपणे पक्ष नेतृत्त्वावर निशाणा साझत असल्याची राजकीय वर्तुळात आहे. यावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भाष्य केलं आहे. षडयंत्र रचणं हा गडकरींचा स्वभाव नाही, असं सरसंघचालकांनी म्हटलं. ते देहरादूनमध्ये बोलत होते. नितीन गडकरी त्यांच्या विधानांमधून अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत असल्याची चर्चा रंगली होती. याबद्दल विचारलं असता सरसंघचालकांनी गडकरींचा स्वभाव तसा नसल्याचं म्हटलं. 'नितीन गडकरींचा स्वभाव अतिशय सौम्य आहे. कटकारस्थान करणं हा त्यांचा स्वभाव नाही. त्यांच्या मनात जर काही इच्छा असेल, तर ते सर्वात आधी मला सांगतील,' असं भागवत म्हणाले. नितीन गडकरींनी गेल्या काही दिवसांमध्ये अनेक विधानं केली आहेत. लोकांनी दाखवलेली स्वप्नं पूर्ण झाली नाहीत, तर लोक धुलाई करतात, असं गडकरींनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यावेळी गडकरींचा निशाणा पंतप्रधान मोदींवर असल्याची चर्चा झाली होती. त्याआधी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील भाजपाच्या पराभवानंतर नितीन गडकरींनी केलेल्या विधानानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पराभवाची जबाबदारी नेतृत्त्वाची असते. तुमचे खासदार काम करत नसेल, तर त्यासाठी तुम्ही जबाबदार असता, अशा आशयाचं विधान गडकरींनी केलं होतं. यानंतर काही दिवसांपूर्वीच, जो आपले घर सांभाळू शकत नाही, तो देश काय सांभाळणार? असा सवाल त्यांनी विचारला होता. त्यामुळे गडकरी अप्रत्यक्षपणे मोदींवर निशाणा साधत असल्याची चर्चा सुरू झाली होती.
नितीन गडकरींच्या 'त्या' विधानांवर मोहन भागवत म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 12:00 PM