RSS Mohan Bhagwat: आताच्या घडीला देशभरात अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुस्थान हा हिंदुस्थानच राहिला पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. एका मुलाखतीत बोलताना, मोहन भागवत यांनी हिंदुस्थान आणि हिंदु समाजाबाबत स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली.
हिंदुस्थान हा हिंदुस्थानच राहिला पाहिजे, हे सत्य आहे. परंतु, भारतात राहणाऱ्या मुस्लिम समाजाला येथे कोणताही धोका नाही. मुस्लिम बांधवांनी मनात कोणतीही भीती ठेऊ नये. भारतात इस्लामला कोणताही धोका नाही. मात्र, मुस्लिम बांधवांनी आपल्या श्रेष्ठत्वाशी संबंधित विधाने करणे सोडायला हवे, असा सल्ला मोहन भागवत यांनी दिला. आपण एकत्र राहू शकत नाही, हे नरेटिव्ह मुस्लिम समाजाने सोडून द्यायला हवे. खरे तर इथे राहणार्या प्रत्येकाने असा विचार एकत्र नांदण्याचाच विचार केला पाहिजे. मग तो हिंदू असो वा कम्युनिस्ट असो, असे मोहन भागवत म्हणाले.
संघाने त्याला पाठिंबा दिला आहे
जगभरातील हिंदूंमध्ये एक प्रकारची आक्रमकता दिसून येत आहे. कारण १ हजार वर्षांपासून सतत युद्धात असलेल्या या समाजात एक जागरुकता आली आहे. तुम्ही पाहिले असेल की हिंदू समाज १ हजारे वर्षे युद्धाच्या छायेत राहिला. हा लढा परकीय आक्रमणे, परकीय प्रभाव आणि परकीय कारस्थानाविरुद्ध चालला. या लढ्याला संघाने त्याला पाठिंबा दिला. इतर लोकांनीही पाठिंबा दिला. या कारणांमुळे हिंदू समाज जागृत झाला आहे. तसेच जे दीर्घकाळापासून लढत आहेत त्यांनी आक्रमक होणे स्वाभाविक आहे, असे मोहन भागवत यांनी नमूद केले आहे.
हिंदू ही आपली ओळख आहे, आपले राष्ट्रीयत्व आहे
हिंदू ही आपली ओळख आहे, आपले राष्ट्रीयत्व आहे, आपल्या सभ्यतेचे वैशिष्ट्य आहे. एक असा गुण जो प्रत्येकाला आपले मानतो, सर्वांना बरोबर घेऊन जातो. फक्त आमचे खरे आणि तुमचे खोटे, असे आम्ही कधीच म्हणत नाही. तुम्ही तुमच्या ठिकाणी चांगले, आम्ही आमच्या ठिकाणी चांगले. यासाठी लढाई कशाला करा, एकत्र पुढे जाऊया - हे हिंदुत्व आहे, असे मोहन भागवत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संघाकडे पूर्वी तुच्छतेने पाहिले जायचे. पण आता ते दिवस संपले आहेत. आमच्या मार्गात ज्या काट्यांचा सामना करावा लागला, त्यांचे चरित्र आता बदलले आहे. पूर्वी विरोध आणि हेटाळणी सहन करावी लागत होती. पण संघाला मिळालेल्या नव्या स्वीकृतीने संसाधने, सुविधा आणि विपुलता दिली आहे, असे मोहन भागवत म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"