नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाच्या सर्व खासदारांना दलितांच्या घरी जाण्याच्या सूचना केल्या होत्या. यानंतर भाजपाचे अनेक खासदार दलितांच्या घरी जेवायला जाऊ लागले. भाजपाच्या या दलित प्रेमावर संघ नाराज असल्याचं दिसतंय. फक्त दलितांच्या घरी जाऊन आणि त्यांच्यासोबत जेवून काहीही होणार नाही, असं सरसंघचालक मोहन भागवतांनी म्हटलंय. दिल्लीत संघाची एक बैठक झाली. यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी समरसता अभियानावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 'आपण अष्टमीला दलित समाजातील मुलींना घरी बोलावतो. त्यांची पूजा करतो. मात्र आपण आपल्या मुलींना दलितांच्या घरी पाठवतो का?,' असा सवाल भागवत यांनी विचारला. 'ज्यावेळी दोन्ही बाजूंनी पुढाकार घेतला जाईल, तेव्हाच समरसता अभियान यशस्वी होईल. त्यामुळे केवळ दलितांच्या घरी जाऊन काहीही होणार नाही. दलितांचंही आपण आपल्या घरी स्वागत करायला हवं,' असं सरसंघचालकांनी म्हटलं. केवळ दलितांच्या घरी जाऊन त्यांच्या सोबत जेवून समरसता निर्माण होणार नाही, असं बैठकीला उपस्थित असलेले विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी म्हटलं. 'दलित समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि प्रतिष्ठेसाठी काम करण्याची गरज आहे. आपण घरी गेलो म्हणून दलितांना धन्य वाटेल, अशी जर कोणाची समजूत असेल, तर तो त्यांचा फक्त अहंकार आहे. जर कोणी स्वत:ला थोर समजून इतरांना कमी लेखून त्याच्या घरी जेवायला जात असेल, तर याला समरसता म्हणता येणार नाही,' असं कुमार यांनी म्हटलं.
फक्त दलितांच्या घरी जेवू नका- मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2018 3:36 PM