एकीकडे भाजपा जातीय जनगणनेच्या विरोधात असताना, त्यावर काहीच बोलत नसताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. समाजातील एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी जातीय जनगणनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी नव्याने पाऊले उचलण्याचा सल्ला दिला आहे.
या दोन्ही विषयांवर आरएसएसची एक बैठक झाली. यावेळच्या चर्चेत अनेक विषय घेण्यात आले तसेच भविष्याबाबतही काही निर्णय घेण्यात आले आहेत. जात जनगणनेमुळे समाजाची एकता आणि अखंडता धोक्यात येऊ शकते, अशी भुमिका संघाने मांडली आहे. यामुळे यापासून वाचण्यासाठी जनस्तरावर एकोपा वाढवण्यासाठी काम केले जाईल, असे ठरविण्यात आले आहे.
जातीवर आधारित मोजणी हा समाजातील संवेदनशील मुद्दा आहे. तसेच राष्ट्रीय एकतेसाठीदेखील महत्वाचा आहे. याचा उपयोग प्रचारासाठी किंवा निवडणुकीसाठी केला जाऊ नये. कल्याणकारी हेतूंसाठी आणि प्रामुख्याने दलित समाजाची संख्या जाणून घेण्यासाठी सरकार त्यांची संख्या मोजू शकते, असे संघाने म्हटले आहे. आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ही माहिती दिली आहे.
बंगाल, वायनाड आणि तामिळनाडूमध्ये घडलेल्या घटनांवरही आरएसएसच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या प्रश्नाबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच यावर सरकारने कारवाई करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.