RSS-Congress:RSS कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात पाठवल्या चड्ड्या, कर्नाटकात नेमकं चाललंय काय..?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 02:20 PM2022-06-07T14:20:23+5:302022-06-07T14:21:22+5:30
RSS-Congress: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे.
RSS-Congress:कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात (RSS) केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापले आहे. संघाचे कार्यकर्ते आपला निषेध नोंदवण्यासाठी अनोखी पद्धत अवलंबत आहेत. 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा निषेध म्हणून 'चड्डी' जाळा', असे वक्तव्य सिद्धरामय्यांनी केले होते.
काँग्रेस कार्यालयात 'चड्डी'ची भेट
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आरएसएसचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात चड्डी पाठवत आहेत. कर्नाटकातील मंड्यामध्ये मंगळवारी आरएसएसचे कार्यकर्ते लोकांकडून चड्ड्या गोळा करताना दिसले. या चड्ड्या काँग्रेसच्या कार्यालयात पाठवणार आहेत.
Karnataka | RSS workers in Mandya district have collected shorts to send to the Congress office as a mark of their protest against Siddaramaiah’s remarks against RSS Khaki shorts (06.06) pic.twitter.com/8K4ydcxeP0
— ANI (@ANI) June 7, 2022
वाद कसा सुरू झाला?
आरएसएसच्या खाकी चड्डीवरून कर्नाटकच्या राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे. भाजप सरकारच्या शैक्षणिक धोरणाच्या निषेधार्थ NSUI कार्यकर्त्यांनी शिक्षणमंत्र्यांचा निषेध करत त्यांच्या तुमाकुरू निवासस्थानाबाहेर आरएसएसच्या खाकी चड्ड्या जाळल्या. त्यावेळी शिक्षणमंत्री घरी नव्हते. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून विद्यार्थी नेत्यांना अटकही केली. सरकारच्या या निर्णयामुळे संतप्त झालेल्या माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषदेत चड्डी पेटवण्याचे वक्तव्य केले.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची तीव्र प्रतिक्रिया
सिद्धरामय्या यांच्या चड्डी जाळण्याच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, सिद्धारामय्या आणि काँग्रेसची चड्डी सैल झाली आहे. त्यांची चड्डी फाटलीये, म्हणूनच ते आमची चड्डी जाळण्याचे वक्तव्य करत आहेत. उत्तरप्रदेशात त्यांची चड्डी हिसकावली, चामुंडेश्वरीच्या निवडणुकीत मतदारांनी सिद्धारामय्यांचे चड्डी आणि धोतर फेडले. आधी स्वतःची चड्डी गच्च करा, नंतर RSS ची चड्डी जाळा, अशी खोचक टीका त्यांनी केली.