RSS on Same Sex Marriage: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. राहुल यांनी अधिक जबाबदारीने भाष्य केले पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच, जगात भारत देशाची चांगली छबी निर्माण करणे अधिक गरजेचे असल्याचे ते म्हणाले. याच वेळी सध्या गाजत असलेल्या समलैंगिक विवाहाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. 'काही लोकांनी हिंदुत्वाची कल्पना विकृत करण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर नव्या पिढीला योग्य इतिहास सांगण्याची गरज आहे,' असे म्हणत RSS तर्फे त्यांनी समलिंगी विवाहाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
RSS ने केंद्र सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले. "विवाह फक्त स्त्री-पुरुषांमध्येच झाला पाहिजे. ते म्हणाले की, देशाची छबी जागतिक पातळीवर बदलण्याची गरज आहे. काही लोकांनी हिंदुत्वाची कल्पना विकृत करण्याचा प्रयत्न केला आहे. देशाच्या इतिहासाचा विपर्यास करून काही लोकांनी सांगितले आहे. आज आपल्याला योग्य इतिहास सांगण्याची गरज आहे. भारताचा सांस्कृतिक वारसा योग्य पद्धतीने कसा मांडायचा हेही सांगणे तितकेच आवश्यक आहे," असे अतिशय स्पष्ट आणि रोखठोक मत होसबळे यांनी मांडले.
राहुल गांधींना RSSचे सडेतोड प्रत्युत्तर
राहुल गांधींच्या वक्तव्याचाही दत्तात्रय होसबळे यांनी समाचार घेतला. "मला वाटते यावर काहीही बोलणे योग्य नाही. त्यांच्या काँग्रेसच्या पूर्वजांनीही संघाबद्दल बराच अपप्रचार केला आहे. त्यामुळे मला त्याच्याबद्दल एवढेच म्हणायचे आहे की किमान राहुल यांनी तरी आता अधिक जबाबदारीने बोलावे आणि वास्तवाकडे पाहावे. राहुल गांधी म्हणतात लोकशाही धोक्यात आहे. तसे असल्यास, भारतात निवडणुका कशा होत आहेत? निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे लोकही जिंकत आहेत. राहुल गांधींचा विचार केला तर ते ज्या लोकशाहीबद्दल बोलतात, त्याच लोकशाहीप्रधान भारतात त्यांच्या पक्षाने आणलेल्या आणीबाणीसाठी आजपर्यंत त्यांनी माफी का मागितली नाही?" असे सडेतोड प्रत्युत्तर त्यांनी राहुल गांधींना दिले.
विध्वंसक शक्तींपासून सावध रहा!
कोणाचेही नाव न घेता दत्तात्रय होसाबळे म्हणाले, “काही लोक देश तोडणाऱ्या शक्ती आहेत. त्यांचे ब्रीदवाक्यच ते आहे. अशा घोषणा आता विद्यापीठातूनही दिल्या जात आहेत. सरकार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल आणि त्यासाठी सामंजस्याचे काम संघ करेल, तसेच चर्चाही घडवून आणेल. पण आपण साऱ्यांनी देश तोडणाऱ्या शक्तींपासून सावध राहण्याची गरज आहे."