नवी दिल्ली - भारतीय राज्यघटनेमधील काही तरतुदींबाबतच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवर विरोधकांकडून नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असते. दरम्यान, संघाच्या एका वरिष्ठ नेत्याने घटनेतील धर्मनिरपेक्ष शब्दाबाबत केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्य नेत्यांपैकी एक असलेले आणि प्रजन प्रवाहचे राष्ट्रीय संयोजन नंदकुमार यांनी राज्यघटनेमध्ये समाविष्ट असलेल्या धर्मनिरपेक्ष या शब्दाचा पुनर्विचार व्हावा, असे मत मांडले आहे. धर्मनिरपेक्ष हा शब्द पाश्चात्य कल्पना आहे, असा दावाही त्यांनी केला. देशाच्या राज्यघटनेमध्ये भारत हा एक लोकशाही संघराज्य, स्वायत्त, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष देश असेल, असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. मात्र यातील धर्मनिरपेक्ष या शब्दाबाबत नंदकुमार यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. नंदकुमार म्हणाले की, ''धर्मनिरपेक्षता ही पाश्चात्य कल्पना आहे. ती पश्चिमेकडून आली आहे. वास्तविकदृष्ट्या ती पोपच्या वर्चस्वाच्या विरुद्ध आहे. भारताला धर्मनिरपेक्षतेची गरज नाही.''नंदकुमार यांनी गुरुवारी ''बदलते दौर मे हिंदुत्व'' नावाच्या पुस्तकाचेही प्रकाशन झाले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात कृष्ण गोपाल यांनीह सहभाग घेतला होता. नंदकुमार यांनी ''पश्चिम बंगालचे इस्लामीकरण'' या आपल्या पुस्तकामधून त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. ''आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत याची ग्वाही देणारी पाटी लावण्याची गरज आहे का? की आपला व्यवहार, कार्य आणि भूमिकेच्या माध्यमातून आपण ते सिद्ध केले पाहिजे? याचा विचार व्हायला हवा,'' असे नंदकुमार यांनी सांगितले. ''घटनेच्या प्रस्तावनेमध्ये धर्मनिरपेक्ष शब्दाला स्थान असणे गरजेचे नाही. तसेच संविधानाचे निर्मातेसुद्धा या शब्दाच्या विरोधात होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कृष्णस्वामी अय्यर यांच्यासह सर्वांनी या शब्दाबाबत चर्चा केली होती. तसेच घटनेच्या प्रस्तावनेमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द असू नये असे मत मांडले होते. तरीही त्यावेळी या शब्दाची मागणी करण्यात आली, चर्चा करण्यात आली, तसेच घटनेत हा शब्द समाविष्ट करू नये, असा निर्णयही घेण्यात आला होता.''असे नंदकुमार म्हणाले. मात्र 1976 मध्ये इंदिरा गांधी यांनी घटनेच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष शब्द समाविष्ट करण्यासाठी भर दिला. तेव्हा त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे याबाबतचे मत नाकारण्यात आले, असा दावाही त्यांनी केला. मात्र लोकसभेत 303 जागा असलेल्या भाजपावर धर्मनिरपेक्ष शब्द हटवण्यासाठी दबाव आणणार का? असे विचारले असता त्यावर भाष्य करण्यास नंदकुमार यांनी नकार दिला.
संविधानाच्या प्रस्तावनेतून ''धर्मनिरपेक्ष'' शब्द हटवण्यात यावा, आरएसएसच्या नेत्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 9:44 AM