नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही लोकशाही मानणारी संघटना असल्याचं प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी सरसंघचालकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मुखर्जींचे आभार मानले. 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही लोकशाही मानणारी संघटना असून संघ लोकांना जोडण्याचं काम करतो. आम्ही देशात कोणलाही शत्रू मानत नाही. भारतामाता ही सर्वांची आहे,' असं सरसंघचालक म्हणाले. 'भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती आपली आहे, यात कोणतंही दुमत नाही. विविधतेचा सन्मान करुन एकता जपणं आवश्यक आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाची सेवा करायला हवी,' असं सरसंघचालकांनी म्हटलं. 'आम्ही देशातील प्रत्येक व्यक्तीबद्दल सद्भावना बाळगतो आणि मार्गक्रमण करतो. स्थापनेनंतर संघासमोर अनेक अडचणी आल्या. मात्र तरीही संघानं आपली वाटचाल कायम राखली. आता संघ लोकप्रिय आहे. आम्ही जिथे जातो, तिथे आम्हाला सन्मान मिळतो आहे,' असंही ते म्हणाले. यावेळी सरसंघचालकांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीवरुन होणाऱ्या उलटसुलट चर्चेवरही भाष्य केलं. 'अनेक विचारांचे महापुरुष आमच्या कार्यक्रमात येतात. मात्र यावेळी कार्यक्रमाची जरा जास्तच चर्चा झाली,' असं भागवत म्हणाले. 'प्रणव मुखर्जी यांना कसं आणि का बोलावलं, याबद्दलची चर्चा निरर्थक आहे. प्रणव मुखर्जी यांनी कार्यक्रमासाठी वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे,' असं सरसंघचालकांनी म्हटलं.
संघ ही लोकशाही मानणारी संघटना- मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2018 8:54 PM