ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार भारतासह जगभरात झाला असून तब्बल ३९ देशात संघाच्या शाखा आहेत. जगभरात संघाचा विस्तार करण्याची धुरा 'हिंदू स्वयंसेवक संघा'च्या (एचएसएस) च्या खांद्यावर असून नेपाळमध्ये सर्वाधिक शाखा आहेत तर त्या पाठोपाठ १४६ शाखांसह अमेरिका दुस-या क्रमाकांवर आहे. 'एचएसएस' इतर देशांमध्ये चिन्मय मिशन व रामकृष्ण मिशन यां सारख्या अन्य सांस्कृतिक संस्थासोबत मिळून काम करतं, असे आरएसएचे मुंबईतील समन्वयक रमेश सुब्रमण्यम यांनी सांगितले. १९९६ ते २००४ या कालावधीत मॉरिशअसमध्ये संघाच्या शाखा उभ्या करण्यात सुब्रमण्यम यांचे मोठे योगदान आहे.
या शाखा भारतीय भूमीवर नव्हे तर परदेशात असल्यामुळे आम्ही त्यांना 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' नव्हे तर 'हिंदू स्वयंसेवक संघ' असे संबोधतो. कारण याच शाखांच्या माध्यमातून जगभरातील हिंदू एकमेकांशी जोडले जातात, असे सुब्रमण्यम यांनी सांगितले. नेपाळपाठोपाठ अमेरिकेत संघाच्या सर्वाधिक शाखा आहेत, तेथील प्रत्येक राज्यात आम्ही पोहोचलो असून शाखांची संख्या तब्बल १४६ इतकी आहे, अशी माहिती ज्येष्ठ प्रचारक सतीश मोध यांनी सांगितले. ते संघाचे परदेशातील कामा २५ वर्षांहून अधिक काळापासून करत आहेत. युकेमध्ये ८४ शाखा असून लंडनमध्ये ते आठवड्यातून दोनवेळा भेटतात. मध्य आशियामध्ये ५ शाखा आहेत मात्र तेथे बाहेर भेटण्यास परवानगी नसल्याने सर्व जण एखाद्या स्वंयसेवकाच्या घरी भेटतात. एवढेच नव्हे तर फिनलँडमध्ये संघाची ई-शाखाही आहे. व्हिडिओ-कॉन्फरन्सिंगद्वारे विविध देशांतील स्वयंसेवक या ई-शाखेत सहभागी होतात, असे रमेश यांनी सांगितले. या शाखांमध्ये २५ प्रचारक आणि १०० हून अधिक विस्तारक असून ते संघाच्या कामाचा विस्तार करण्यात मग्न आहेत, अशी माहितीही रमेश यांनी दिली. भारतात संघ स्वयंसेवकांचा गणवेश पांढरा शर्ट व खाकी हाफ पँट असा असला तरी परदेशात संव्यसेवक पांढरा शर्ट व काळी पँट असा गणवेश घालतात. आणि ' भारत माता की जय' ऐवजी ' विश्व धर्म की जय' अशी घोषणा दिली जाते.
संघाची पहिली शाखा भरली होती जहाजावर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची परदेशातील पहिली शाखा एका जहाजावर भरली होती. जगदीश चंद्र शारदा आणि माणिकभाई रुगानी हे दोघेही १९४६ साली मुंबईहून मोम्बासा (केनिया) येथे जात असताना जहाजावर अचानक त्यांची भेट झाली आणि त्यांनी तिथेच संघाची प्रार्थना म्हटली, अशी आठवण संघाचे ज्येष्ठ सदस्य रमेश मेहता यांनी सांगितली.