लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एक महिन्यावर आली आहे. २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होईल. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या बाजूने जनमत तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संपर्क मोहीम सुरू केली आहे. सूत्रांनुसार, संघाने आपल्या सर्व सहकारी संघटनांशी समन्वय राखत जनतेत मिसळून थेट संपर्क साधणे सुरू केले आहे.
विभागनिहाय स्वयंसेवकांचे गट
रा. स्व. संघाने राज्यात विभागनिहाय सदस्यांचे गट नेमले असून आपापल्या भागांत हे स्वयंसेवक लोकांशी थेट संपर्क साधत आहेत. ५-१० लोकांना एकत्र करून हे सदस्य बैठका घेऊन त्यांच्यापर्यंत हवा तो संदेश पोहोचवत आहेत.
थेट समर्थन नाही, पण...
सूत्रांनुसार, हे सदस्य थेट भाजपचे समर्थन न करता राष्ट्रीय हितासह हिंदुत्व, सुशासन, विकास, जनकल्याणाचे मार्ग आणि सामाजिक मुद्द्यांवर लोकांशी चर्चा करत आहेत. या माध्यमातून लोकांची मते जाणून घेतल्यानंतर आपले धोरण ठरवत आहेत.
अशी केली तयारी...
स्वयंसेवकांचे असे गट तयार करण्यापूर्वी संघाने आपल्या सहकारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र करून धोरण ठरविण्यासाठी राज्यात सर्व पातळीवर समन्वय बैठका घेतल्या. त्यानंतर स्वयंसेवकांचे गट नेमण्याचे निश्चित करण्यात आले.
छोट्या छोट्या बैठकांवर भर
- हरयाणात सत्ताधारी भाजपच्या विरोधात लाट असल्याचे चित्र होते. लोकांतूनही तीव्र प्रतिक्रिया होत्या. तरीही भाजपने ९० पैकी ४८ जागा जिंकून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. यामागे संघाचे नियोजन आणि राज्यभर समन्वय हेच प्रमुख कारणांपैकी एक होते. - हरयाणात या सदस्यांनी सव्वालाखाहून अधिक छोट्या बैठका घेतल्या होत्या. नेमकी हीच रणनीती आता महाराष्ट्रासाठी आखली जात आहे.
‘शिवसंग्राम’च्या ज्योती मेटे शरद पवार गटात
मुंबई: शिवसंग्राम संघटनेच्या नेत्या आणि दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी रविवारी शरद पवार गटात प्रवेश केला. शरद पवारांनी त्यांना विधानसभेचे तिकीट देता आले नाहीतर विधानपरिषदेवर पाठविण्याचा शब्द दिला आहे. ज्योती मेटे बीड लोकसभेची निवडणूक लढण्यास उत्सुक होत्या. त्यावेळीही त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. पण, पवारांनी बजरंग सोनवणे यांना तिकीट दिले. आताही त्यांनी विधानसभेसाठी चाचपणी सुरू केली आहे. रविवारी त्यांनी शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदींच्या उपस्थितीत प्रवेश केला.
बीडमध्ये सध्या शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर हे आमदार आहेत. अजित पवारांनी बंड केल्यानंतर ते शरद पवारांच्या सोबतच राहिले आहेत. तसेच लोकसभेला बजरंग सोनवणे यांच्या विजयातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्यांचे तिकीट कापणे कठीण आहे. अशावेळी मराठा मतदारांचे प्राबल्य असलेल्या बीड विधानसभेत ज्योती मेटे यांना प्रवेश देऊन पवारांनी ही जागा सुरक्षित केल्याची चर्चा आहे.