RSS vs Rahul Gandhi: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या 'भारत जोडो' या आंदोलनादरम्यान भाजपावर टीका करणारे ट्विट केले. त्या टीकेच्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी जो टी-शर्ट घातला आहे, तो तब्बल ४१ रुपयांचा ब्रँडेड टी-शर्ट असल्याचे भाजपाने उत्तरादाखल केलेल्या ट्विटमध्ये म्हटले. त्यानंतर भाजपा-काँग्रेस यांच्यात फोटो-वॉर सुरू झाले. त्यातच आता काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले आहे. RSS च्या गणवेशातील हाफ-पँटचा फोटो त्यांनी ट्विट केला आणि त्या पँटला आग लागल्याचे दाखवून, आता हळूहळू संघाचा प्रभाव कमी होत जातोय, असा संदेश त्यातून देण्यात आला. या फोटोसोबत, 'देशाला द्वेषाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी आणि भाजपा-आरएसएसकडून झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी अजून १४५ दिवस बाकी आहेत. आम्ही टप्प्याटप्प्याने आपले ध्येय गाठू’, असेही या फोटोसोबत लिहिले. यावरून संघाकडून आणि भाजपाकडून राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात आली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत काँग्रेसच्या एका वादग्रस्त ट्विटवर आता RSS ने प्रतिक्रिया दिली आहे. संघाचे सह-सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. 'राहुल गांधी हे गेली कित्येक वर्षे आमचा द्वेष करत आहेत. त्यांच्या वडिलांनी आणि आजोबांनीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला रोखण्यासाठी खूप प्रयत्न केले. संघावर त्यांनी दोनदा बंदीही घालण्याचा प्रयत्न केला. पण RSS ला थांबवणे त्यांना शक्य झाले नाही. याउलट संघाचा विस्तार अधिक वाढत गेला. कारण आम्हाला लोकांचा पाठिंबा मिळत राहिला. पण राहुल गांधी मात्र अजूनही आमचा द्वेष करतात हे स्पष्ट दिसून येते.
'राहुल गांधी, तुम्हाला या देशात हिंसाचार हवा आहे का?'
भाजपने काँग्रेसच्या ट्विटचा तीव्र निषेध केला. “काँग्रेसने लोकांना भडकवण्यासाठी आणि चिथवण्यासाठी हे ट्विट केले आहे. त्यांची भारत जोडो यात्रा ही 'आग लगाओ' यात्रा आहे. काँग्रेसने अशा प्रकारचे द्वेष पसरवणारे फोटो ट्विट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. राहुल गांधी हा फोटो ट्विट करून, तुम्हाला या देशात हिंसाचार हवा आहे का? लोकांनी एकमेकांचा द्वेष करावा आणि जाळपोळ करावी असं तुम्हाला वाटतं का? हे 'भारत जोडो आंदोलन' नसून 'भारत तोडो' आंदोलन आहे. काँग्रेसने हा फोटो तात्काळ हटवावा", भाजप नेते संबित पात्रा म्हणाले.