नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार (Indresh Kumar) सातत्याने विरोधकांवर टीका करत असल्याचे पाहायला मिळत आहे. भगव्या दहशतवादाच्या नावाखाली मला अडकवण्यासाठी UPA सरकारने तब्बल ४०० कोटी रुपये खर्च केले, असा मोठा दावा इंद्रेश कुमार यांनी केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न मुस्लिम राष्ट्रीय मंच आणि अन्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना इंद्रेश कुमार यांनी सदर दावा केला आहे.
जाती आणि धर्माला दहशतवादाशी जोडणे चुकीचे आहे. असे करता कामा नये. कारण दहशतवादाला प्रोत्साहन देणारे केवळ आपल्या फायद्यासाठी धर्माच्या नावावर शोषण करतात. यावर नियंत्रण ठेवायला हवे. तसेच यासंदर्भात सशक्त कायदाही तयार करायला हवा. याशिवाय धर्म आणि जातीच्या नावाखाली होणारे शोषणही थांबवायला हवे. यातील दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी, असे इंद्रेश कुमार यांनी सांगितले.
UPA सरकारने ४०० कोटी खर्च केले
यूपीए सरकारने भगव्या दहशतवादाच्या नावाखाली मला अडकवण्याचे खूप प्रयत्न केले. यासाठी ४०० कोटी रुपये खर्च केले. पूर्ण यंत्रणा कामाला लावली. मात्र, आरोपींच्या यादीत माझे नाव घालण्यात त्यांना यश आले नाही. अखेर जनतेनेच यूपीए सरकारला बाहेरचा रस्ता दाखवला आणि भाजपला मोठा पाठिंबा दर्शवला, असे इंद्रेश कुमार यांनी सांगितले. तसेच माझे नाव साक्षीदारांच्या यादीतही समाविष्ट करण्यात आले नव्हते. मात्र, या प्रकरणात मी सामील असल्याचा मोठा गवगवा करण्यात आला होता, असा आरोप करत चुकीच्या आणि खोट्या गोष्टींविरोधात आवाज उठवायला हवा. यासाठी मागे हटू नये. सत्याच्या मागे प्रामाणिकपणे उभे राहायला हवे, असेही इंद्रेश कुमार यांनी म्हटले.
दरम्यान, यापूर्वी जम्मू-काश्मीरविषयी बोलताना इंद्रेश कुमार म्हणाले होते की, पाकिस्तान जर म्हणत असेल की काश्मीरशिवाय तो अपूर्ण आहे. तर मग लाहोर आणि कराचीशिवाय भारत अपूर्ण आहे, असे आता म्हणायला हवे, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले होते. चीन आणि पाकिस्तानच्या भारतविरोधी धोरणावर टीका करत निषेध केला. तसेच चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा, याचा पुनरुच्चारही इंद्रेश कुमार यांनी केला होता.