नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा मार्ग सरळ नाही. त्यांनी जबरदस्तीने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला तरी ते सरकार टीकणार नाही. त्यांना पक्षातच विरोध आहे. मुळात नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला आहे. पराभूत झालेला माणूस पंतप्रधान कसा होऊ शकतो? असा सावल करत, माझ्या माहितीप्रमाणे, संघाची टॉप लिडरशीपही पर्यायाच्या चाचपणीसंदर्भात काम करताना दिसते आहे, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ते दिल्लीत पत्रकारांसोबत बोलत होते. संजय राऊत म्हणाले, "माझ्या माहितीप्रमाणे नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा मार्ग सरळ नाही. गेल्या दोन निवडणुकीत, अगदी रुबाबात, ५६ इंचांची नसलेली छाती पुढे काढून मोदी चालत होते. ते चित्र तुम्हाला आज दिसत नाहीये. मोदींचा चेहरा बघा, मोदींची बॉडी लँगुएज बघा, मोदींची भाषा बघा. पक्षामध्ये विरोध आहे, ही माझी माहिती आहे. संघाचा विरोध आहे." एवढेच नाही तर, "मुळात नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला आहे. पराभूत झालेला माणूस पंतप्रधान कसा होऊ शकतो?" असा सवालही यावेळी राऊतांनी केला.
मोदींनी जबरदस्तीने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला तरी... -राऊत पुढे म्हणाले, "तुमच्या (नरेंद्र मोदी) नेतृत्वाखाली भरतीय जनता पक्षाने निवडणूक लढली. तुमच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला. पक्षाला बहुमत मिळाले नाही आणि तुम्ही कुबड्यांवर सरकार बनवून विजयाचा जल्लोष करताय? हे काय आहे? देशातील जनतेला तुम्ही मूर्ख समजता का? जर तुम्हाला खरो-खरच लोकशाहीची चाढ असेल, तर पक्षामध्ये, संसदिय पक्षामध्ये निवडणुक घ्या आणि मोदी हवे आहेत का विचारा. माझ्या माहितीनुसार, मोदींचा मार्ग सरळ नाही. मोदींनी जबरदस्तीने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला तरी ते सरकार टीकणार नाही. हे मी तुम्हाला आता खात्रीने सांगतोय. म्हणून राज्याराज्यात ही रडारड सुरू आहे. मोदींना पक्षातच विरोध आहे. मोदी-शाह यांची जी दादागिरी होती, इडी, सीबीआय ती यापुढे चालणार नाही. आमच्यासारखे लोक देश आणि लोकशाहीसाठी लढायला तयार आहेत."
"माझ्या माहितीप्रमाणे संघाची टॉप लिडरशीप ही पर्यायाच्या चाचपणीसंदर्भात काम करताना दिसते आहे. कुणाला पंतप्रधान करायचे हा जरी भाजपचा प्रश्न असता, तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा बाबतीत एक भूमिका बजावत असतो. २०१४ आणि २०१९ च्या पाशवी बहूमतानंतर, मोदी आणि शाह यांनी संघालाच आपला गुलाम करण्याचा प्रयत्न केला. पण आज संघ अशा परिस्थितीत आहे की, ते एखादा निर्णय घेऊ शकतात आणि नरेंद्र मोदींना घरी पाठवू शकतात," असा दावाही यावेळी संजय राऊत यांनी केला.