राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे (RSS) नेते इंद्रेश कुमार यांनी महात्मा गांधी यांच्या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. 75 वर्षांपूर्वी भारताला फाळणीच्या रूपात स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी इंग्रजांसोबत चर्चा करण्यासाठी बापूंनी जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिना यांची आपले एडीसी म्हणून निवड केली नसती, तर भारताचे तुकडे झाले नसते. एवढेच नाही, तर त्यावेळी बापूंनी सरदार पटेल, सुभाष चंद्र बोस अथवा महर्षी अरविंद यांची एडीसी म्हणून निवड केली असती, तर भारताची फाळणी झाली नसती. बापूंच्या एका छोट्याशा चुकीने देशाची फाळणी केली, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे. ते राजस्थानातील जयपूर येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
इंद्रेश कुमारांनी अशा प्रकारचे भाष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी यापूर्वीही अशा प्रकारची वक्यव्य केली आहेत. नुकतेच संघाच्या मुख्यालयावर तिरंगा ध्वज न फडकावण्यासंदर्भात काँग्रेसने संघावर निशाणा साधला होता. यावर इंद्रेश कुमार यांनी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींसह इतर काही नेत्यांवर निशाणा साधला होता. आरएसएसला शिव्या देणे, ही लोक फॅशन समजतात, त्यांनी या फॅशनपासून मुक्त व्यायला हवे. हीच इश्वराकडे प्रार्थना, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले होते.
राष्ट्रपतींचा अपमान करण्यात आला - काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लोकसभेत ‘राष्ट्रपत्नी’ म्हणून संबोधित केले होते. यामुळे मोठा गदारोळ झाला होता. यावरूनही इंद्रेश कुमार यांनी निशाना साधला आहे. ते म्हणाले, काही लोकांनी भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केला. त्यांना राष्ट्रपतींचा अपमान करतानाही काही वाटत नाही. अशा प्रकारचे हे लोक आहे.