लुधियाना - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कार्यकर्ता रवींद्र गोसाई यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. लुधियानामधील कैलाश नगर येथे अज्ञातांनी रवींद्र गोसाई यांच्या गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात रवींद्र गोसाई यांचा जागीच मृत्यू झाला. 60 वर्षीय रवींद्र गोसाई संघाच्या शाखेतून परतत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर दुचाकीवरुन आले होते. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हल्लेखोर आणि हत्येच्या कारणाचा खुलासा अद्याप झालेला नाही.
15 फेब्रुवारी 2016 रोजी केरळमधील कन्नूरमध्ये आरएसएस कार्यकर्ता पी व्ही सुजीत याची हत्या करण्यात आली होती. पी व्ही सुजीतच्या घरच्यांसमोरच त्याची हत्या करण्यात आली होती. बचावासाठी गेलेले नातेवाईकदेखील या हल्यात जखमी झाले होते. या हल्यात कन्नूर जिल्हा पंचायतीचे सदस्य वेणुगोपाळदेखील जखमी झाले होती. त्यावेळी भाजप नेत्यांनी या हत्येमागे सीपीआय कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. हत्या होण्याच्या काही दिवस आधी भाजपा आणि सीपीआय कार्यकर्ते आपापसांत भिडले होते, ज्यामध्ये अजानूर ग्रामपंचायतीच्या 3 लोकांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते.
कन्नूर जिल्ह्यातच डिसेंबर 2013मध्ये भाजपा नेता विनोद कुमार यांची हत्या करण्यात आली होती ज्यामध्ये 2 नेते जखमीदेखील झाले होते. केरळ आणि देशातील दुस-या भागांमध्ये आरएसएस कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले आणि हिंसेविरोधात भाजपा जनरक्षा रॅली काढत आहे. आज केरळमध्ये या रॅलीचा शेवटचा दिवस आहे.